वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट.
वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट... देशाच्या सामाजिक समस्यांवर चिंतन सभ्यतेच्या भव्य महालावर प्रगतीचे सुवर्णकळस झळकत असले,विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली असली आणि तंत्रज्ञानाने जगाला एका स्पर्शाच्या अंतरावर आणले असले, तरी समाजजीवनाच्या अंतःकरणात असंख्य वेदनांचे व्रण आजही ठसठशीतपणे जिवंत आहेत. बाह्य वैभवाच्या चकाकीने अंतःकरणातील अंधार नाहीसा होत नाही; उलट तो अधिक गडद होत जातो. राष्ट्राच्या भवितव्याला पोखरणाऱ्या सामाजिक समस्या या वाळवीप्रमाणे शांतपणे आपल्या संस्कृतीच्या पायाभरणीला कुरतडत आहेत. भाकरीच्या शोधात भटकणारा हात जेव्हा पुस्तकाऐवजी विटा उचलतो, तेव्हा भविष्याच्या कपाळावर दुर्दैवाची काळी रेष उमटते. एका बाजूला ऐश्वर्याच्या झगमगाटात न्हालेली गगनचुंबी इमारती आकाशाशी स्पर्धा करतात, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीतील मिणमिणत्या दिव्याजवळ आयुष्याचा संघर्ष अश्रूंनी उजळत असतो. ही दरी केवळ आर्थिक नसून मानवी संवेदनांच्या अपयशाची साक्ष आहे. जातीयता आणि धार्मिक विद्वेष हे समाजाच्या अंगणात उगवलेले भेदाभेदांचे जंगल आहे. माणसाला माणूस म्हणून पाहण्याऐव...