वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट.

 वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट...


देशाच्या सामाजिक समस्यांवर चिंतन सभ्यतेच्या भव्य महालावर प्रगतीचे सुवर्णकळस झळकत असले,विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली असली आणि तंत्रज्ञानाने जगाला एका स्पर्शाच्या अंतरावर आणले असले, तरी समाजजीवनाच्या अंतःकरणात असंख्य वेदनांचे व्रण आजही ठसठशीतपणे जिवंत आहेत. बाह्य वैभवाच्या चकाकीने अंतःकरणातील अंधार नाहीसा होत नाही; उलट तो अधिक गडद होत जातो. राष्ट्राच्या भवितव्याला पोखरणाऱ्या सामाजिक समस्या या वाळवीप्रमाणे शांतपणे आपल्या संस्कृतीच्या पायाभरणीला कुरतडत आहेत.
 भाकरीच्या शोधात भटकणारा हात जेव्हा पुस्तकाऐवजी विटा उचलतो, तेव्हा भविष्याच्या कपाळावर दुर्दैवाची काळी रेष उमटते. एका बाजूला ऐश्वर्याच्या झगमगाटात न्हालेली गगनचुंबी इमारती आकाशाशी स्पर्धा करतात, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीतील मिणमिणत्या दिव्याजवळ आयुष्याचा संघर्ष अश्रूंनी उजळत असतो. ही दरी केवळ आर्थिक नसून मानवी संवेदनांच्या अपयशाची साक्ष आहे.
       जातीयता आणि धार्मिक विद्वेष हे समाजाच्या अंगणात उगवलेले भेदाभेदांचे जंगल आहे. माणसाला माणूस म्हणून पाहण्याऐवजी त्याच्या नावात, जातीत किंवा श्रद्धेत मोजण्याची प्रवृत्ती ही मानवतेच्या मंदिरातील सर्वांत मोठी विटंबना आहे. प्रेमाच्या जागी संशय, बंधुभावाच्या जागी द्वेष आणि संवादाच्या जागी संघर्ष उभा राहिला, की संस्कृतीच्या वीणेतील स्वरही करुण विलाप करू लागतात.
        भ्रष्टाचार ही केवळ आर्थिक गैरव्यवहाराची घटना नाही; तो नैतिक मूल्यांच्या संकोच असतो. जेव्हा प्रामाणिकपणाचा मार्ग काट्यांनी भरला जातो आणि अप्रामाणिकतेच्या वाटेवर फुलांची उधळण होते, तेव्हा न्यायाची देवीही आपल्या डोळ्यांवरील पट्टीमागे अश्रू लपवू लागते. अधिकार जेव्हा सेवाभाव विसरतात आणि सत्ता जबाबदारीऐवजी स्वार्थाची दासी बनते, तेव्हा लोकशाहीचे पावित्र्य कलंकित होते.
        स्त्रीवरील अत्याचार ही सभ्यतेच्या कपाळावर उमटलेली सर्वांत वेदनादायी जखम आहे. ज्या संस्कृतीने स्त्रीला सृजनाचे प्रतीक मानले, त्याच समाजात तिच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे ही शोकांतिका आहे. स्त्रीचा सन्मान हा केवळ कायद्याचा विषय नसून समाजाच्या संस्कारांचा आरसा आहे.
         शिक्षणातील विषमता ही भविष्याच्या सूर्यालाच ग्रहण लावणारी सावली आहे. ज्ञानाची गंगा सर्वदूर वाहिली पाहिजे; परंतु आजही अनेकांच्या ओंजळीत अज्ञानाचीच वाळू येते. शिक्षण जर केवळ पदवीपुरते मर्यादित राहिले आणि संस्कारांची शिदोरी हरवली, तर सुशिक्षितांचा समाज घडेल; पण सुसंस्कृत समाज निर्माण होणार नाही.
       पर्यावरणाचा ऱ्हास हा निसर्गाविरुद्ध उभारलेला मूक युद्धघोष आहे. वृक्षांची कत्तल, नद्यांचे प्रदूषण, हवेत मिसळलेले विष आणि काँक्रीटच्या जंगलात हरवलेली हिरवाई ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर मानवाच्या अस्तित्वाचीच शोककथा आहे. निसर्ग हा जिंकण्याचा विषय नसून जपण्याचा वारसा आहे.
        बेरोजगारी ही तरुणाईच्या डोळ्यांतील तेज हिरावून घेणारी क्रूर वास्तवता आहे. शिक्षणाच्या शिखरावर पोहोचलेले असंख्य युवक जेव्हा रोजगाराच्या शोधात निराशेच्या वाळवंटात भटकतात, तेव्हा त्यांच्या स्वप्नांचे पंखच छाटले जातात. राष्ट्राची खरी संपत्ती ही त्याची तरुण शक्ती असते; तिच्या क्षमतेला योग्य दिशा मिळाली नाही, तर विकासाची गतीही कुंठित होते.
        या सर्व समस्यांचे निराकरण केवळ शासनाच्या धोरणांनी होणार नाही; त्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या अंतःकरणात कर्तव्य, करुणा, प्रामाणिकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे. समाजपरिवर्तनाची क्रांती तलवारीच्या धारेवर नव्हे, तर विचारांच्या प्रकाशावर घडते. मनुष्याच्या मनात मानवतेचे बीज रुजले, तर समतेचे वृक्ष आपोआप बहरतील
      राष्ट्र हे केवळ सीमारेषांनी आखलेले भूखंड नसते; ते संस्कार, संवेदना, त्याग, प्रेम आणि परस्पर विश्वास यांच्या विणलेल्या अदृश्य धाग्यांचे जिवंत वस्त्र असते. त्या वस्त्राला फाटू न देणे, त्यावर स्वार्थाचे डाग लागू न देणे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक तेजस्वी, अधिक समृद्ध आणि अधिक सुसंस्कृत भारत घडविणे, हेच प्रत्येक सजग नागरिकाचे सर्वोच्च राष्ट्रीय कर्तव्य आहे.

✍️ मनोज राणे 


Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....