नात्याची मखमली शाल
💖नात्याची मखमली शाल💖
जन्माबरोबरच मनुष्य नात्यांच्या अनेक बंधनाची शिदोरी सोबत घेऊन येतो.मनुष्य, मनुष्याचे कुटंब,अनेक कुटंबांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला समाज आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांमधून निर्माण झालेला देश.
नाते कोणतेही असो...नाते आणि झाडं यांच्यात काही गोष्टींबाबत कमालाचे साम्य असते.ज्याप्रमाणे बहर ओसरल्यानंतर झाडाला खतपाण्याची आवश्यकता असते;त्याप्रमाणे नात्यांनाही संयम,सहिष्णुता आणि आत्मियता रूपी खताची आवश्यकता असते.यासाठी एकमेकांची विचारपूस केली पाहिजे... एकमेकांची काळजी घेतली पाहिजे... एकमेकांवर नियंत्रण न ठेवताही एकमेकांच्या तणावांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे ...आपलेपणा असल्याशिवाय कोणतंही नातं बहरत नाही.
नाती निर्माण करता आली पाहिजेत.. नाती फुलवता आली पाहिजेत आणि त्या बहराचा आनंदही घेता आला पाहिजे.
संवेदना हा कोणत्याही नात्याचा पाया असतो.... संवदेना म्हणजे साम आणि वेदना, म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप,जे मनुष्याला आयुष्यातील ऊन सावलीच्या भावनांशी ओळख करून देत असते.संवाद साधत धावपळीतही नात्याचे अस्तित्व जपता आले पाहिजे.आपलेपणाची जाणीव करून देता आली पाहिजे.आपलेपणाची हीच भावना मनुष्याच्या जीवनाला सबळ आणि सार्थक बनवते.
नात्यातील याच नादयुक्त गोष्टी आपल्याला रिलॅक्स करत असतात.कोणी तरी आपल्या सोबत आहे या जाणिवेतून,भावनेतून परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची,लढण्याची नवीन ताकद,ऊर्जा निर्माण होत असते.शेवटी कोणत्याही नात्याचे हेच तर कर्तव्य असते.
प्रत्येकाचं नातं, विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते.समोरच्याला कमी लेखले म्हणून आपण चांगले सिद्ध होतो हेच चूक आहे.नातेसंबंध बिघडण्याचं कारण म्हणजे अहंभाव.अहंकार एकदा स्वार झाला की नाते सडायला सुरुवात होते.अहंकार काबूत कसा ठेवायचा याची जाण असेल तर कोणतेही नाते सु़ंंदर बनतेच.
मनाचे मनाशी असलेले संबंध स्पष्ट असणं गरजेचं आहे.नाते जोडताना नात्याविषयी तुम्हाला काय वाटतं,ते तसं का वाटतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.वागण्यात प्रामाणिकपणा, विश्वासार्हता हवी.कोणतीही अपेक्षा न धरता नाते जपण्यासाठी धडपड असावी.
ज्याचा पाया केवळ स्वार्थ भावना आहे अशी नाती केवळ दु:ख,तणाव आणि वैफल्य निर्माण करतात.जीवनात जास्त नाती असण हे आवश्यक नाही,पण जी नाती आहेत त्यात जीवंतपणा असणे गरजेचे असते.अनेक नाती थोडयाशा बेबनावामुळे आणि अहंकारामुळे काळाच्या ओघात स्वाहा: होतात.समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्याव,आपण जसे त्यांच्याशी वागतो तस त्यांनीही आपल्याशी वागावे अशी अपेक्षा आपण ठेवतो...पण असं होईलच याची शाश्वती नसते..नात्यातील अशाच प्रकारच्या जास्तीच्या अपेक्षांमुळे नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होतो.मनात असूनही पुन्हा यात जवळिकता निर्माण करता येत नाही.अशा वेळी पश्चतापाशिवाय दूसरे काही हाती येत नाही.हे टाळण्यासाठी विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत,जेणेकरून आपल्याला इतरांना समजून घेणे सोपे जाईल.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणे येतात,
आयुष्यात एका अनोळखी वळणावर ओळखीची काही नाती अनोळखी बनून अनोळखी व्यक्ती आपल्या मनात हक्काचे नाते निर्माण करतात ..कालपर्यंत अनोळखी असलेले लोक आयुष्यात येऊन आयुष्यात नात्याची मखमली शाल निर्माण करतात.
-मनोज राणे