सुखाची ओंजळ


"कितीही लवकर निघालो तरी काही ना काही प्रोब्लेम्स निर्माण होतच राहतात...."
असे मनाशी पुटपुटत शिरीष मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये शिरला.नेहमीप्रमाणे स्टेशन माणसांच्या गर्दीने ओथंबलेले होते.बाकी काही कां असेना मुंबईत गर्दीचा तुटवडा कधीही भासत नाही.मुंबईत समुद्राच्या लाटा आणि मुंबईतील गर्दी या दोन्ही गोष्टी नेहमीच उसळत असतात. गर्दीला ढकलत, स्वतःला सावरत शिरीष तिकीट खिडकीपाशी पोहचला....
"एक व्ही.टी"
"एक तास लोकल ट्रेन बंद आहे...... देऊ कां तिकीट?"
"बंद आहे?" मग इतकी लोकं स्टेशनवर कशी काय?"
"माहिती नसलेले तुम्ही थोडे एकटेच आहेत.तेही तुमच्यासारखेच आहेत."
तिकीट खिडकीच्या आत बसलेल्या माणसाशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही हे समजल्यावर शिरीष तेथून निघून स्टेशन बाहेर आला.व्ही.टीला कसे पोहचायचो हा प्रश्न निर्माण  झाला होता.टॅक्सींंना शिरीषने हात करूनही एकही टँक्सी थांबायला तयार नाही.रस्त्यावरील प्रत्येक टँक्सी प्रवासी कवेत घेऊन धावत होती.चालत शिरीष पुढे आला.....काय करावे हे त्याला समजेना.जिग्नेश शहाला आज भेटणे कोणत्याही परिस्थितीत अत्यंत आवश्यक होते. मोठ्या प्रयत्नांंनी शिरीषला बिल्डिंग डिजाईनचा मोठा प्रोजेक्ट मिळाला होता.जिग्नेश शहा हा गुजराती बिल्डर कामाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे हे शिरीष इतर लोकांकडून कळले होते."हा प्रोजेक्ट मिळाला तर लाईफ कुठल्या कुठे जाईल .....पण साला हे रेल्वेचे लफडे.....काल कार बिघडली नसती तर आज ही सगळी झंझट करावी लागली नसती." स्वतःच्या मनातील शब्दांच्या बडबडीला त्रागाची जोड देत शिरीष तसाच पुढे चालत गेला.बसने तरी जावे हा विचार त्याच्या मनात चमकून गेला.जरा पुढे गेल्यावर त्याला एक बसस्टॉप दिसला... गर्दी तुरळक दिसत होती बसस्टॉपवर.
काँलेज लाईफनंतर बस या प्रकाराशी संपर्क तुटलेला शिरीष काही क्षण भूतकाळातील बससाठी केलेल्या धावपळीत फिरुन आला.
"व्ही.टी.ला जाते ना येथून बस?"
"कालपर्यंत तरी येथून बस जात होत्या व्ही.टीला....आजचे माहिती नाही."
चेहऱ्यावर हसू पसरवत बसस्टॉपमागील पानाच्या दुकानात बसलेल्या माणसाने शिरीषला सांगितले.खोळंब्याने वैतागलेल्या शिरीषला पान टपरीवाल्याच्या विनोदावर हसू आले नाही.त्याने मान फिरवून पुन्हा रस्त्याच्या दिशेने बघायला सुरुवात केली.आजचा दिवसच खराब असे म्हणत शिरीष बस दिसते कां हे पाहू लागला.
"साहेब तुम्ही रस्त्याच्या मधोमध जाऊन उभं राहिला तरी बस तिच्याच वेळेला येणार. तुमच्यासाठी बस थोडीच लवकर डिपोतून सुटणार हाय."
पानवाल्याच्या या विनोदावर शिरीषने दुर्लश करायचे ठरवले,पण कां कोणास ठाऊक शिरीष पुन्हा पानवाल्याच्या दुकानाच्या दिशेने आला.
"साहेब येथून जाणाऱ्या सगळ्या बसेस या व्ही.टीलाच जातात.नवीन दिसताय या एरियात."
"हो...."
"तरीच....आज रेल्वेने गोंधळ घातला.नाही तर तुम्ही लोक कशाला बसची पायरी चढायला 
जाताय."
"तसं नाही.मी कित्येक वर्षे बसने प्रवास केला आहे.....एक गोल्ड फ्लेक सिगारेट द्या"
चिडचिड कमी करण्यासाठी शिरीषने सिगारेट पिण्याचे ठरवले.
"ही घ्या सिगारेट साहेब.....येतात बस १५-२० मिनीटांनी."
सिगारेट पेटवून शिरीषने पानवाल्याला थँक्स म्हणाला आणि दुकानाच्या पुढे येऊन सिगारेट ओढू लागला.
आयुष्यात काही लोक वादळ यावे तशी येतात. वादळ नेहमीच घोंघावत येते असे नाही. काही सुंदर वादळे मनाच्या प्रांगणात हळुवारपणे प्रवेश करतात.
"ये अनघा बेटा...आज नेहमी सारखीच सुंदर दिसतेस.आज दिल्लीहून येणारा एक माणूस भलताच खूष  होणार."
"काका,तुम्ही पण ना......हो, आज त्याच्यासाठी नटण्यासाठी  जरा जास्तच मेहनत घेतली आहे."
"वाह,बेटा...राकेशला विचारतोच आल्यावर की बाबा तुझी नोकरी,करीयर,प्रमोशन या गोष्टी होतच राहतील.... माझ्या लेकीशी लग्न कधी करतो ते सांग आधी."
"करणार आहोत लग्न आम्ही लवकरच...थोडी कंपनीची कामे बाकी आहेत त्याची,म्हणून दिल्लीला गेला आहे तो."
"पोटात जागा रिकामी ठेवली आहे तुझ्या लग्नातील लाडूसाठी"
"लाडूच काय गुलाबजाम, पेढे, बर्फी देखील मिळतील तुम्हाला..."
"ते पण खाणार... माझ्या लेकीचे लग्न म्हणजे साधी गोष्ट आहे कां?"
रस्त्याच्या दिशेने पाहत सिगारेट ओढत बसची वाट पाहणारा शिरीष कानावर आलेल्या या संवादांंनी भानावर आला.... ते खळखळून हसणे त्याच्या कानाला कोठेतरी सुखावून गेले होते.
ब्राऊन रंगाचा सुंदर पंजाब सूट परिधान केलेली सुंदर तरुणी पानवाल्याशी बोलताना शिरीषला दिसली.तरुणी श्रीमंत घरातील वाटत होती.एवढी श्रीमंत आणि सुंदर तरुणी त्या फटीचर पानवाल्याशी एवढी आपुलकीने कशी बोलते,हा प्रश्न शिरीषला उगाचच वाटून गेला,पण आपल्याला काय करायचं आहे.त्यांचे ते बघून घेतील...असे स्वतःला सांगत शिरीष पुन्हा बसची वाट पाहू लागला.
"आज सकाळीच राकेश फ्लाईटमध्ये बसला आहे. एअरपोर्टवरुन त्याने फोन केला होता मला."
"करणारच राकेश तुला फोन.दमचं तसा मी दिला होता त्याला."
" काका,तुम्ही राकेशला अक्षरशः छळता....राकेशच मला म्हणत असतो की सासरा खूप छळतो..लेकीच्या नव-याला एवढं छळू नका.नाही तर जायचा पुन्हा दिल्लीला पळून."
"तो काय जातोय पळून... मग मी आहे आणि तो हाय...म्हणून म्हणतोय आमच्यात हाणामारी होण्याच्या आत लग्न उरकून टाक."

या पानवाल्याची इतकी श्रीमंत आणि सुंदर मुलगी?.....हा विचार त्या सुंदर तरुणीच्या मधाळ आवाजाने शिरीषच्या मनातून दूर फेकून दिला.शिरीषने त्या तरुणीला आता लक्षपूर्वक बघायला सुरुवात केली.बघताक्षणी कोणीही प्रेमात पडेल असे सौंंदर्य होते.तिचा चेहरा अधिक सुंदर की तिचे हसणे अधिक सुंदर यावर तिसरे महायुद्ध होऊ शकते.राकेश खूपच नशीबवान होता लेकाचा. इतकी सुंदर तरुणी मिळणे हे नशीब चांगले असल्याशिवाय शक्यच नाही.... अशा विविध विचारांमध्ये शिरीष गुरफटून गेला. जिग्नेश शहा....व्ही.टी....मेगा डिझाईन प्रोजेक्ट.... या गोष्टींची जागा आता त्या तरुणीने घेतली होती.
"आमची पहिली भेट याच बसस्टॉपवर झाली होती काका,म्हणून राकेश मुंबई बाहेर गेला असेल तर नेहमी मुंबईत येताना मला याच बसस्टॉपवर भेटायला बोलावतो."
"मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी... आम्हा  गरीबांना काय माहिती याची."
"यात गरीब किंवा श्रीमंत असे काही नसते काका.राकेश मनाने हळवा आहे.त्याचा तोच हळवा स्वभाव मला आवडला."
"आता हे तू मलाच सांगतेस.अग माझ्या दुकानाच्या साक्षीने तर तुमच्या प्रेमाचे मजले बनले आहेत."
"हाहाहा...खरं आहे काका....तुमच्या समोर तर सर्व गोष्टी घडल्या आहेत."
अच्छा म्हणजे या पानवाल्याने या लोकांचे लव अफेअर होण्यासाठी मदत केली होती तर.तसाही तो पानवाला बोलण्यात थोडा आगाऊपणा करतो म्हणा....शिरीषच्या डोक्यात पानवाला उगाचच गेला.

"सिगारेट पित जाऊ नका.चांगली गोष्ट नाही."
मागून आलेल्या मधाळ आवाजाने शिरीष चपापला.
"मी सिगारेट... ना.. ना...ना...सिगारेट आपले ते कधीतरी...." असे असंबद्ध बडबडून शिरीषने त्या अनपेक्षित मधाळ आवाजाला प्रतिसाद दिला.आधीच ती सुंदर तरुणी आपल्याशी बोलते आहे हे बघूनच शिरीष बावचाळून गेला होता.
"सुरुवात असेच होते प्रत्येक व्यसनाची.राकेशला सुद्धा सवय होती....आता सोडली आहे त्याची सवय मी."
"राकेश ?" 
शिरीषच्या तोंडातून नकळतपणे राकेश शब्द निघून गेला.
"राकेश... माझे होणारे पती...सध्या दिल्लीला गेले आहेत. सकाळीच फ्लाईटमध्ये बसले आहेत.आमची पहिली भेट याच बसस्टॉपवर झाली होती,म्हणून राकेश मुंबई बाहेर गेला असेल तर नेहमी मुंबईत येताना मला याच बसस्टॉपवर भेटायला बोलावतो राकेश."
ही माहिती शिरीषसाठी आता नवीन नव्हती. काही क्षणापूर्वीच शिरीषने ही माहिती पानवाला आणि त्या तरुणीच्या संवादातून ऐकली होती.
"पण ते जाऊ दे.ही मला कशाला हे सर्व सांगत आहे?"  शिरीषच्या डोक्यात प्रश्न उपस्थित झाला.
"असे डोळ विस्फारून आश्चर्याने बघू नका.मी आहेच बोलकी बाहुली. मला बोलायला खूप आवडते.ऐकणारा ओळखीचा आहे की अनोळखी...इससे अपून को कुछ भी फरक न पडता."
असे बोलून ती तरुणी जोरदारपणे हसली. शिरीषला मात्र अवघडल्यासारखे झाले.तिचे हसणे ऐकून पानवाला देखील दुकानात हसायला लागला.शिरीषला समजेना की पानवाला आता कोणत्या कारणासाठी हसतोय.
"आवडतात मला बोलकी माणसे."
"पण तसे तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही."
"म्हणजे?...माझा चेहरा.... काय दिसते आहे माझ्या चेहऱ्यावर?"
शिरीष तिच्याकडून अनपेक्षितपणे डागण्यात आलेल्या तोफगोळ्याने चक्रावून गेला.
"म्हणजे बोलकी माणसे तुम्हाला आवडतात, हे तुमचा गोंधळात पडलेला चेहरा पाहून वाटत नाही."
"ते...टेन्शन.... नाही नाही... टेन्शन कसले...कामाचा थोडा तणाव"
"म्हणजे आता सरकारने टेन्शन आणि तणाव या गोष्टीही वेगवेगळ्या केल्या आहेत तर."
ती तरुणी पुन्हा एकदा स्वतःच्या विनोदावर मनमुरादपणे हसली.शिरीषला खजील झाल्यासारखे वाटले.
असेल हिचा बॉयफ्रेंड...त्याने काय फरक पडतोय. मुलगी तर मनाने मनमोकळ्या स्वभावाची आहे. अशी नितळ स्वभावाची माणसे जगात खूप कमीच आढळतात. अनोळखी व्यक्तीशी देखील इतकी मनापासून बोलणारी तरुणी असतात तरी कोठे. नाते फक्त प्रेमाचेच नसते.कोणत्याही अपेक्षा नसलेली चांगली निखळ मैत्रीसुद्धा असते की जगात.शिरीषची विचारांची तंद्री लागली.
"अहो तुमची व्ही.टीला जाणारी बस आली."
तिच्या आवाजाने शिरीषच्या विचारांची तंद्री तुटली.व्ही.टीची बस बसस्टॉपवर आली होती.बसमध्ये गर्दी होती.उभे राहूनच प्रवास करावा लागणार,हे शिरीषला उमगले.
"खूप गर्दी आहे बसमध्ये. कोण उभे राहून प्रवास करणार इतका दूरचा."
"इतक्या दूरचा? बहुतेक मुंबईतील दिसत नाही तुम्ही."
"नाही मी अस्सल मुंबईकर आहे. पण सकाळपासून एवढी दगदग झाली आहे की पुन्हा उभ्याने बसप्रवास करण्यासाठी त्राण नाही राहिले शरीरात."
"काय तुम्ही लोक. तो राकेश पण तुमच्या सारखाच.नुसती कार पाहिजे त्याला.जसा काही तो जन्मापासून कारमध्येच फिरत होता."
"राकेश कधी येणार आहेत येथे.तुम्ही देखील बराच वेळ झाला बसस्टॉपवर ऊभ्या आहात."
"मोठा माणूस आहे राकेश तुमच्यासारखाच. बसायला सीट मिळत नाही,तोपर्यंत बसच्या जवळ देखील जाणार नाही तो.बसला असेल रिकामी बस कधी भेटते याची वाट बघत.कोणीतरी त्याची इतक्या आतुरतेने वाट बघते याची त्याला कोठे आली काळजी."
"तुमच्या सारख्या सुंदर तरुणीला वाट पाहायला लावणे म्हणजे अक्षम्य अपराधच ."
शिरीष नकळतपणे बोलून गेला.त्याला तिच्याकडून येणाऱ्या प्रतिसादाबद्दल उत्सुकता होती.सुंदरतेमुळे घायाळ झालेला शिरीष हा काही जगातील एकमेव मनुष्य नव्हता.अपेक्षा मनुष्याला खूपदा व्हीलन बनण्यासाठी उद्युक्त करत असतात.
"अच्छा,म्हणजे ओळख होऊन जेमतेम अर्धा तास नाही झाला तर तुम्ही Flirting ही सुरु केले तर." असे म्हणत ती गोड हसली.
"नाही हो.तसे अजिबात नाही.मी जस्ट म्हटले. 
i am sorry,"
"धत तेरी की.तुम्ही तर क्षणात शरणागती पत्करली.सुंदर मुलींना खूष करण्यासाठी मुले प्रयत्न नाही करणार तर काय वयस्कर मंडळी करणार."
"म्हणजे तुम्हाला राग आला नाही?"
"राग कशाला येईल.राग त्यांना येईल,ज्या मुलींना याची सवय नसते.मला खूप आधीपासूनच सवय आहे अशा complimentची."
"म्हणजे तुम्ही स्वतःला सुंदर मानता तर."
"मानायचे काय ...मला माहिती आहे मी सुंदर आहे."
"ते तर आहेच.लकी आहेत राकेश."
"तो कसला लकी.लकी तर मी आहे. मीच त्याला प्रपोज केले होते;आणि ती गोष्ट अजूनही तो मुद्दाम मला चिडवण्यासाठी बोलून दाखवत असतो." असे बोलून ती काहीशी लाजली.
तितक्यात
"अहो तुमची व्ही.टीला जाणारी आणखी एक बस आली.बघा बसायला देखील भरपूर जागा आहे बसमध्ये."
शिरीषला काही सुचेना. आता बसमध्ये चढावेच लागणार. कोणतेही कारण आता देणे शक्य नाही. शिरीष बसमध्ये चढला. बसमधून तिला शिरीषने हात हलवून बाय केले.शिरीषची बस व्ही.टीच्या दिशेने रवाना झाली.
गिरगावात सरपोतदारांंच्या घरात आज थंडगार हवेबरोबर आनंदी क्षणांनी देखील प्रवेश केला होता.
"चला झालं एकदाचे तुझ्या मनासारखे. बरेच महिने तू या प्रोजेक्टसाठी खटाटोप करत होतास."
"हो आई.जिग्नेश शहाला कसं मनवलं हे माझे मला माहिती."
"खरचं बिझनेस करावा तो गुजराती लोकांनी. आपण मराठी लोक त्यांच्यासाठी फक्त काम करत राहणार."
" पैसे देखील चांगले मिळतील की.प्रोजेक्ट गुजराती माणसाचे असो की मद्रासी माणसाचा त्याने काय फरक पडतो."
"बरं बाबा.बोलण्यात तू थोडीच इतरांना ऐकणार आहेस."
 शिरीष आईच्या या वाक्यावर हसला.
"बातों में मेरे से कोई जीत नहीं सकता.तुला तर चांगले माहिती आहे."
"मग एखादी सुंदर मुलगी शोध आणि तुझ्या बोलण्याने जिंकून घे तिचे मन....घरात सून आण रे बाबा आता."
"जसे काही सुंदर मुली नुसत्या बोलण्याने पटतात. काहीतरीच लाँजिक तुझे."
"अरे सुंदर मुलींचे मन तरुण मुलांनी तर रिझवायचे असते.कधी कळणार तुला या गोष्टी."
" हा जणू काही तरुणांना जगात दुसरे काहीच काम नाही."
"अरे बाबा,सुंदर मुलींना खूष करण्यासाठी मुले प्रयत्न नाही करणार तर काय वयस्कर मंडळी करणार."
शिरीष क्षणभर चमकला.काय बोलली आई आता,"सुंदर मुलींना खूष करण्यासाठी मुले प्रयत्न नाही करणार तर काय वयस्कर मंडळी करणार."....हे वाक्य नुकतेच कोठेतरी ऐकले आहे,कोठे बरे ऐकले होते. शिरीष मनातल्या मनात गुगल करु लागला.... यस ....बसस्टॉपवर.... तो पानवाला.... ती तरुणी....राकेश.... व्ही.टी.बस.....शिरीष विचारमग्न झाला.

"जेवताना लक्ष कोठे होते आज तुझे? कसला विचार करत असतोस हल्ली एवढा."
"काही नाही ग...असचं "
"जास्त प्रमाणात विचार करु नकोस. केस पांढरे होतील, आणि लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील व्हायचे ."
असे म्हणत शिरीषची आई हसत किचनमध्ये निघून गेली. शिरीष च्या डोक्यात मात्र बसस्टॉप,पानवाला, ती सुंदर तरुणी फिरत होती.
मनुष्याला विचारांचा गुलाम असे उगाच म्हटले जात नाही. त्या तरुणीच्या विचारांनी शिरीषला आज पुन्हा मुंबई सेंट्रलच्या बसस्टॉपवर खेचून आणले होते.
"अरे साहेब, तुम्ही आज पुन्हा बसस्टॉपवर. आज पुन्हा रेल्वेने हात वर करुन काखा दाखवलेल्या दिसतात."
"नाही तसे नाही. या एरियात आलो होतो.म्हटले थोडी सिगारेट प्यावी."
"प्या ना सिगारेट साहेब. दुकान कशाला उघडले आहे आम्ही." असे बोलून पानवाला जोरात हसला.
सिगारेट पेटवून शिरीषने तीन झुरके मारले.म्हणजे या पानवाल्याच्या लक्षात आलेले दिसत नाही की मी आज त्या सुंदर तरुणीसाठी आलो आहे.पण तिच्या विषयी याला विचारावे कसे...उगाच पानवाल्याला राग आला तर येथेच लोकांकडून मार पडेल.असे विचार करुन शिरीष रस्त्याच्या कडेला उभा राहून बसची वाट पाहत असल्याचे ढोंग करु लागला.

"ये अनघा बेटा...आज नेहमी सारखीच सुंदर दिसतेस.आज दिल्लीहून येणारा एक माणूस भलताच खूष  होणार." या वाक्याने शिरीषला मागे वळून बघण्यास मजबूर केले.हेच वाक्य तो पानवाला त्या दिवशी बोलला होता.शिरीषने मागे वळून पाहिले.तिच तरुणी पानवाल्याशी बोलताना शिरीषला दिसली.बदामी रंगाचा सलवार कुर्ता घातलेली ती आजही तितकीच सुंदर दिसत होती.
"काका,तुम्ही नेहमीच गरजेपेक्षा जास्त कौतुक करता माझे.......हो, आज त्याच्यासाठी नटण्यासाठी  जरा जास्तच मेहनत घेतली आहे एवढेच"
"राकेशला कालच फोन केला होता मी.म्हटले  तुझी नोकरी,करीयर,प्रमोशन या गोष्टी होतच राहतील.... माझ्या लेकीशी लग्न कधी करतो ते सांग आधी."
"तुम्हालाच आमच्या लग्नाची आमच्यापेक्षा जास्त घाई झाली आहे.करणार आहोत लग्न आम्ही लवकरच...थोडी कंपनीची कामे बाकी आहेत त्याची,म्हणून दिल्लीला गेला आहे तो."
"तुझ्या लग्नातील लाडूसाठी वाट बघतोय मी."
"लाडूच काय गुलाबजाम, पेढे, बर्फी देखील मिळतील तुम्हाला..."
"ते पण खाणार... माझ्या लेकीचे लग्न म्हणजे साधी गोष्ट आहे कां?"
हे सगळे संवाद ऐकून शिरीष चक्रावला.एखादा दुसरा संवाद सेम असू शकतो,पण संपूर्ण संवाद जसेच्या तसे रिपीट कसे होतील.शिरीष काहीसा बुचकळ्यात पडला.
अनोळखी व्यक्ती मनाच्या खूप जवळ येण्यासाठी काही सोपस्कार पार पडणे फार आवश्यक असते.वर्षानुवर्षे ओळखीची असलेले लोक क्षणात अनोळखी वाटू लागतात, तर क्षणांपूर्वीची ओळख क्षणात घट्ट ओळख निर्माण करते.
"अरे व्ही.टीवाले ....आज पुन्हा तुम्ही बसची वाट पाहताय."
"म्हणजे माझे नाव व्ही.टीवाले आहे तर...."
"आता माणसाने स्वतःचे नावच सांगितले नाही तर समोरच्या माणसाने कोणत्या नावाने हाक मारायची."
शिरीष मनापासून हसला.
"अच्छा म्हणजे व्ही.टी वाल्यांना हसता सुद्धा येते तर"
"शिरीष सरपोतदार नाव आहे माझे."
"अच्छा... शिरीष सरपोतदार यांनी आपले नाव तर सांगितले पण अनघा परांजपेला तिचे नाव विचारणे मात्र सरपोतदार विसरुन गेले तर."
"मला माहिती आहे की तुमचे नाव अनघा आहे ते."
"ते कसे काय?...नाव कसे समजले तुम्हाला माझे? प्रेमात वगैरे पडला की काय माझ्या. नाही म्हटले माझे नाव वगैरे शोधले म्हणून म्हणतेय."
असे बोलून ती खळखळून हसली.
"नाही हो.त्या दिवशी त्या पानवाल्यांंनी तुम्हाला अनघा म्हणून हाक मारली होती.ते मी ऐकले होते."
"ओह... म्हणजे तुम्ही लोकांचे बोलणे चोरून पण ऐकता तर...वाईट सवय आहे ही सरपोतदार ही."
"नाही... सहज कानावर आले म्हणून समजले तुमचे नाव. बाकी मुद्दामहून वगैरे काही नाही."
"बघा तुम्ही पुन्हा एकदा शरणागती पत्करली. तुम्हाला तर  Flirting  सुद्धा येत नाही."
"नाही तसे काही.... नाही."
शिरीषला काय बोलावे ते सुचेना.
"एक बोलू सरपोतदार. तुम्हाला गर्लफ्रेंड नाही,हे मी लिहून देऊ शकते."
"हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवले?"
"मुलींना एक सेन्स जास्त असतो.हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल."
"कदाचित तुमचा दावा खराही असेल."
"दावा नाही. मी खात्रीने हे सांगू शकते की तुम्हाला गर्लफ्रेंड नाही. गर्लफ्रेंड असलेले तरुण क्षणात मुलींना ओळखू येतात."
"तुमचे म्हणणे खरे आहे.अजून तरी गर्लफ्रेंड वगैरे नाही मिळाली नाही, किंबहुना मी त्यासाठी काही प्रयत्न देखील केले नाहीत."
"मग कधी शोधणार गर्लफ्रेंड, म्हातारपणी?"
"तुमच्या सारख्या सुंदर तरुणी आम्हाला भेटण्यापूर्वीच दुसरीकडे सेट झाल्या."
शिरीषचा आत्मविश्वास आता वाढला होता.आपुलकीच्या देवाणघेवाण व्यवहारात बाकी काही नाही तरी आत्मविश्वास नक्कीच वाढतो.
"माझ्याकडे तर काही तुमची डाळ शिजणार नाही. मागील सहा वर्षांपासून राकेश एके राकेश, आणि पुढील शंभर वर्षे तरी राकेश एके राकेशच असणार आहे."
"तुम्ही माझ्या मनात राकेश यांच्याविषयी असूया निर्माण करत आहात." असे बोलून शिरीष जोरात हसला.
"असूया वगैरे जे काही असेल तो तुमचा प्रश्न आहे. एक मात्र आहे की मी तुमच्यासाठी एखादी चांगली मुलगी मात्र नक्कीच शोधू शकते."
"थँक्स..."
"अरे सरपोतदार तुमची व्ही.टीची बस आली."
"अहो कशाला मला व्ही.टीला पाठवताय.मी गिरगावात राहतो."
"अच्छा. मग आज इकडे कसे?"
"जरा काम होते या एरियात. म्हणून आलो होतो. काम अजून झाले नाही. पुन्हा यावे लागेल तुमच्या एरियात. तुमची काही हरकत नाही ना?"
"घ्या. आम्हाला कसली आली हरकत. आम्ही थोडीच संपूर्ण मुंबई सेंट्रल विकत घेतला आहे."
"तुम्ही कोठे राहता?"
"अरेच्या मी सांगायला विसरले.याच एरियात राहते मी.तो समोरचा चौक दिसतोय ना.त्याच्या मागे आशय बिल्डिंग आहे. त्यात सहावा मजला. फ्लॅट नंबर ३६९." 
"तुम्ही तर संपूर्ण पत्ता सांगितला."
"मग त्यात एवढे.या कधी घरी चहासाठी.आईबाबांना आवडेल तुमचे आदरातिथ्य करायला."
"नक्कीच येईल."
"राकेशला कॉल केला तर त्याचा फोन नॉटरिचेबल येतोय.बहुतेक अजूनही फ्लाईटमध्ये असेल राकेश. दिल्लीहून येताना त्याने मला कॉल केला होता.रेंज आली की करेल तो फोन.......अरे तुमची गिरगावची बस आली."
गिरगावची बस बसस्टॉपवर उभी होती.शिरीष तिला बाय करुन बसमध्ये शिरला, पण त्याच्या डोक्यात काही प्रश्नांची गर्दी झाली होती. त्या दिवशी देखील राकेश फ्लाईटमध्ये बसला होता. त्या दिवशी देखील राकेशने एअरपोर्टवरुन हिला फोन केला होता. तिच पटकथा पुन्हा रिपीट झाली होती....पण कदाचित राकेशला वारंवार दिल्लीला जावे लागत असावे, असा विचार करुन शिरीषने डोक्यात निर्माण झालेले सर्व प्रश्न धुडकावून लावले.
नवीन प्रोजेक्टवर शिरीषने जोरदार काम केले होते. त्यामुळे जिग्नेश शहा शिरीषच्या कामावर जाम खूष होते.म्हणून तर आज त्यांनी शिरीषला त्याच्या घरुन पिकअप करुन आपल्या समवेत साईटवर नेले होते.
"शिरीष जी आपका प्रोजेक्ट डिजाईन एकदम परफेक्ट है.सभी को पसंद आया."
"थँक्स सर"
"ऐसीही मेहनत करो.बहोत आगे जाओगे तुम एक दिन. मेहनत के सिवा कुछ हासिल नहीं होता, यह मेरी बात तुम हमेशा याद रखना."
"यह आप का आशिर्वाद है सर मेरे लिए."
"अरे मेहनत करो.सब कुछ हासिल होगा.....अरे ड्राइवर गाडी मुंबई सेंट्रल से लेना. उस जडेजा को मिलना है....फिर शिरीष जी को गिरगांव छोड़ के आना तू"

जिग्नेश शहाची कार मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर आली....शिरीषने 
हातातील घड्याळात बघितले. शिरीषला काही तरी आठवले.
"सर, मुझे यही पे उतार देना.मुझे यहाँ कुछ काम है"
"शिरीष जी...फिर आप घर कैसे जाओगे. आप तो मेरे साथ आये थे."
"कुछ नहीं सर...मैं टँक्सी कर लूँगा."
"अच्छा ठिक है.ड्रायवर गाडी रोकना जरा"

शिरीष पुन्हा त्याच बसस्टॉपवर आला. पानवाल्याच्या दुकानात पानवाला नेहमीप्रमाणेच हसत होता.
"साहेब, अजून तुमचे काम झालेले दिसत नाही.ही घ्या तुमची सिगारेट."
काही न बोलता शिरीषने सिगारेट पेटवली...सिगारेटचे झुरके घेत शिरीष बसस्टॉपवर फिरु लागला.
"ये अनघा बेटा...आज तर फारच सुंदर दिसतेस.आज दिल्लीहून येणारा एक माणूस जाम खूष  होणार." 
या वाक्याने शिरीषला थबकला.पुन्हा तेच वाक्य शिरीषच्या कानावर आले होते. हेच वाक्य तो पानवाला प्रत्येक  दिवशी बोलला होता.शिरीषने मागे वळून पाहिले.तिच तरुणी पानवाल्याशी बोलताना शिरीषला दिसली.आज शिरीषचे त्या तरुणीच्या सुंदरतेकडे लक्ष गेले नाही. नक्कीच काहीतरी गोची आहे हे शिरीषला वाटू लागले.तो त्या दोघांमधील संवाद नीटपणे ऐकू लागला.
"काका,झाले कां तुमचे सुरु. किती कौतुक कराल लाडक्या लेकीचे.आज राकेश येणार आहे दिल्लीहून. मग नटायला नको कां?"
"राकेशला कालच फोन केला होता मी.म्हटले  तुझी नोकरी,करीयर,प्रमोशन या गोष्टी होतच राहतील.... माझ्या लेकीशी लग्न कधी करतो ते सांग आधी."
"तुम्हालाच आमच्या लग्नाची आमच्यापेक्षा जास्त घाई झाली आहे हे मला चांगले माहिती आहे .करणार आहोत लग्न आम्ही लवकरच...थोडी कंपनीची कामे बाकी आहेत त्याची,म्हणून दिल्लीला गेला आहे तो."
"तुझ्या लग्नातील लाडूसाठी वाट बघतोय मी."
"लाडूच काय गुलाबजाम, पेढे, बर्फी देखील मिळतील तुम्हाला..."
"ते पण खाणार... माझ्या लेकीचे लग्न म्हणजे साधी गोष्ट आहे कां?"
हा संवाद ऐकून शिरीषची खात्री पटली की तेच डायलॉग, तिच पटकथा, तिच तरुणी पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. मोठा काही तरी झोल आहे. शिरीषने तिच्याकडे बघून हात हलवला.
"अरे सरपोतदार आज पुन्हा तुम्ही बसस्टॉपवर."
"सरांनी सोडले येथे.माझे थोडे काम होते येथे.ते केले आणि आता निघालोय घरी."
"छान,पण मी तुमच्यावर प्रचंड नाराज आहे."
"ते कां बरे."
"लोकांनी घरचा पत्ता देऊनही काही लोक आमच्या घरी चहासाठी आले नाहीत."
"असे होय.अहो कामात सध्या बिझी असतो ना."
"मोठी लोक तुम्ही. या कधीतरी आमच्या गरीबांच्या घरी."
"नक्कीच येणार... तुमच्या राकेशला सुद्धा भेटायचे आहे मला."
"नक्कीच भेटा. राकेशला तुम्ही चांगला दम द्या.बघा ना सकाळी दिल्लीहून राकेश फ्लाईटमध्ये बसला आहे. एअरपोर्टवरुन त्याने मला  कॉल देखील केला.आता त्याला फोन लावला तर त्याचा फोन नॉट रिचेबल."
यावेळेस शिरीषला अचंबा वाटला नाही. तेच डायलॉग तो आज पुन्हा ऐकत होता.या रहस्याचा शोध घेतला पाहिजे असे शिरीषने मनोमन ठरवले होते.
"राकेश नेहमी दिल्लीला जातात कां?"
"नाही हो.पहिल्यांदाच दिल्लीला गेला आहे राकेश. पुन्हा त्याने दिल्लीला जायचे नाव तरी काढून बघावे.त्याला चांगली सरळ करते."
असे बोलून ती जोरात हसली.पण शिरीषला हसू आले नाही. ती बराच वेळ शिरीषबरोबर बोलत होती. तेच डायलॉग शिरीष पुन्हा ऐकत होता.जे तिने मागील दोन्ही वेळेस शिरीषला बोलले होते.बस आल्यानंतर बसमध्ये बसून शिरीष घरी पोहचला.त्याच्या डोक्यात ती गूढ तरुणी,तो पानवाला हेच फिरत होते. त्या तरुणीबरोबर बसस्टॉपवरील इतर लोक कोणीही बोलत नाही हेही त्याच्या लक्षात आले. इतकी सुंदर तरुणी बसस्टॉपवर असूनही तेथील लोक तिच्याकडे एकदा बघून तिच्याकडे दुर्लक्ष करत होते.त्याच विचारात शिरीष जेवण करुन झोपी गेला.

इतक्या लवकर शिरीष मुंबई सेंट्रल भागात कधी आला नव्हता. आज त्याला गूढ प्रकरणाचा छडा लावायचा होता.आज तो जाणूनबुजून नेहमीच्या वेळेला तेथे आला नव्हता.शिरीषला बसस्टॉपवर पानवाल्याच्या दुकानात पानवाला दिसला.
"साहेब, आज इतक्या सकाळी... ही घ्या तुमची सिगारेट."
पानवाल्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शिरीषने सिगारेट पेटवली.त्याने पानवाल्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले.पानवाला त्याच्या कामात बिझी होता.
सिगारेटचे झुरके घेत शिरीषने पानवाल्याला प्रश्न केला
"कशासाठी करता तुम्ही दोघे हे सर्व?"
"म्हणजे साहेब? समजले नाही मला."
"तुम्ही आणि ती मुलगी बसस्टॉपवर जे नाटकं करता ते माझ्या लक्षात आले आहे."
"कसले नाटक साहेब. ती छोकरी तिच्या बॉयफ्रेंडसाठी येते. मी तर तिला माझी लेक मानतो."
"कितीवेळा तिचा  बॉयफ्रेंड दिल्लीहून येतो. दररोज तो दिल्लीला जातो?.ती तर म्हणाली की तो एकदाच दिल्लीला गेला आहे."
पानवाल्याच्या चेहऱ्यावर घामाचे.थेंब जमायला सुरुवात झाली. 
"ते आपल्याला काही माहिती नाही. ती छोकरी येते एवढेच मला माहिती आहे. तो कितीदा दिल्लीला जातो हे मला कसे माहिती असणार?"
"तुम्हाला सगळे माहिती आहे. मी सगळे ऐकले आहे. तुम्ही राकेशला ओळखता. तुम्ही त्याच्याशी फोनवर सुद्धा बोलता हेही मला माहिती आहे."
हे वाक्य ऐकून पानवाल्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
"साहेब तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत, पण मी ती कधीही देणार नाही. तुम्हाला उत्तरे हवी असतील तर ती आशय बिल्डीगमधील सहाव्या मजल्यावरील ३६९ नंबरच्या फ्लॅटमध्ये मिळतील, पण तेथे सकाळी १० ते ११ या वेळेत जावा."
असे बोलून पानवाल्याने शिरीषसमोर हात जोडले आणि तो जोरजोरात रडू लागला.पानवाल्याची अवस्था बघून शिरीषने तेथून निघून जाणे पसंत केले.

मुंबई सेंट्रल परिसरात १० वाजेपर्यंत टाइमपास करत शिरीष आशय बिल्डीगमधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३६९ येथे पोहचला.त्याने बेल वाजवली. दरवाजा एका महिलेने उघडला.
"अनघा परांजपे"
"हो अनघा परांजपचे घर.काय झालं. अनघा ठीक आहे ना....?"
"हो त्या ठीक आहेत. मी तुम्हाला भेटायला आलो आहे."
"आम्हाला? ते कशासाठी?"
तितक्यात आतून "अग कोण आले आहे? घरात तरी बोलव.दरवाज्यात काय गप्पा मारत बसली आहेस." असा पुरुषी आवाज आला.
"या आत "
महिलेने शिरीषला आत घेतले आणि दरवाजा बंद केला. समोर साठीच्या घरातील पुरुष बसला होता.
"आम्ही ओळखले नाही तुम्हाला." त्या व्यक्तीने शिरीषला प्रश्न केला.
"मी शिरीष सरपोतदार. अनघा परांजपे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी घरी येण्यासाठी फारच आग्रह केला होता म्हणून आज आलो.
त्या नवरा बायकोने एकमेकांकडे पाहिले.
"पण अनघा तुमच्या विषयी कधी बोलली नाही."
"अहो ३ वेळा तर आमची भेट झाली आहे."
"अच्छा.... मग काही हरकत नाही. अगं जरा चहाचे बघ जरा."
महिला किचनमध्ये निघून गेली. जाताना तिने हॉलमधील सर्व लाईट्स सुरु केले. सर्व भिंतीवर अनघाचे फोटो होते.विविध स्पर्धेत तिने जिंकलेल्या ट्रॉफीज समवेत तिचे फोटो होते.
"अरे वाह अनघा या तर मोठ्या स्पोर्ट्स प्लेअर आहेत."
त्या व्यक्तीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
अनघाच्या वडिलांच्या निस्तेज प्रतिसादाने शिरीषला मोठे आश्चर्य वाटले.तितक्यात त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवर गेले,जिथे अनघाचे एका देखण्या तरुण व्यक्तीस बरोबर अनेक फोटो लावलेले होते.त्या फोटो खाली "
Angha Loves Rakesh"  असे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेले होते.ते फोटो पाहून शिरीष बोलला की,
"अनघाला अगदी योग्य असा जोडीदार लाभला आहे." 
यावर देखील अनघाच्या वडिलांनी निस्तेज प्रतिसाद दिला.अनघाच्या वडिलांचे असे निस्तेज वागणे शिरीषला काहीसे खटकले.तरी तो काही न बोलता भिंतीवरील इतर गोष्टी बघू लागला.भिंतीवर अनघाने बनवलेल्या दोन-तीन सुंदर पेंटिंग होत्या.भिंतीच्या बाजूच्या बाजूच्या टेबलवर भली मोठी पुस्तकांची रांग लावण्यात आलेली होती.यावरून शिरीषच्या लक्षात एक गोष्ट आली की अनघा ही विविध कलांमध्ये निपुण आहे.इतक्यात अनघाची आई किचन मधून चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन आली.
"चहा घ्या." अनघाच्या वडिलांनी शिरीषला  सुचवले.चहाचा कप हातात घेऊन शिरीष विषयांतर करत म्हणाला की,"काकू,अनघा खूपच प्रतिभावंत आहे."
"हो,पोर खूप गुणाची आहे,पण..." असे बोलून अनघाच्या आईने अनघाच्या वडिलांकडे बघत बोलणे मध्येच थांबवले.
"एक विचारू कांं, जर आपणास राग येणार नसेल तर." शिरीषने हिम्मत करुन विचारले.
"विचारा की."अनघाचे वडील बोलले.
"मला काही गोष्टी विचित्र वाटत आहेत." शिरीषने शेवटी मनातील गोष्ट बोलून टाकली.
"मला कल्पना आहे त्या गोष्टीची.त्या गोष्टी तुमच्यासाठी विचित्र असतील,पण आमच्यासाठी त्या गोष्टी विचित्र नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटते हा मुद्दा  गौण आहे." अनघाच्या वडीलांनी पुन्हा एकदा थंड प्रतिसाद देत उत्तर दिले.
"मला काहीतरी गूढ वाटत आहे."
"यात कोणते गूढ आहे असे आपणास वाटते?"
 "अनघाचे वागणे देखील बरेचसे गूढ आहे.त्यात आपल्या दोघांची उत्तरे ही त्या गूढतेमध्ये अधिक भर घालत आहेत."
" हे बघा सरपोतदार, आम्ही तुम्हाला चांगले ओळखत नसलो तर तरी तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात हे आम्ही ओळखले आहे."अनघाचे वडील कणखरपणे बोलले.
"ते कसे काय? मी तर तुम्हाला आता पहिल्यांदा भेटलो आहे ." शिरीषच्या बोलण्यात नवल दिसत होते.
"माणसाची ओळख होण्यासाठी खूप गाठीभेटी व्हाव्यात असे काही नसते "
"तरी देखील...तुम्ही मला कोणत्या आधारावर चांगले ठरवत आहात हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल."
"जाणून घेऊन तुम्ही काय करणार आहात?" पुन्हा अनघाच्या वडीलांनी चर्चेचे रस्ते बंद करून टाकले.
"जाणून घेऊन असे काही वेगळे करणार नाही.  पण माणसाला उत्सुकता असते."
"तुम्हाला मी चांगला व्यक्ती म्हणालो,यामागे एकमेव कारण आहे,ते म्हणजे मागील तीन वर्षांमध्ये आमचे नातेवाईक सोडले तर  अनघाची चौकशी करण्यासाठी आलेले तुम्ही एकमेव व्यक्ती आहात."
"मला समजले नाही." शिरीष आश्चर्यचकित होऊन बोलला.यावर अनघाच्या आईला रडू आवरले नाही.अनघाची आई रडू लागली.
"तुझ्या रडण्याने काय होणार आहे कां?" अनघाचे वडील अनघाच्या आईवर काहीसे रागावले.
अनघाच्या आई शिरीषकडे पाहत बोलली,"तुम्हाला देखील ही गोष्ट पटते ना की आमची अनघा एकदम नॉर्मल आहे म्हणून." "अगदी १००% टक्के तुमचं म्हणणे बरोबर आहे.अनघा उत्साही विनोदी आणि हजरजबाबी मुलगी आहे हे कोणीही सांगेन."
"बघा मी बोलते तेव्हा अनघाचे वडील माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही." अनघाच्या आईच्या बोलण्यात हताशता दिसत होती.
"अगं माझ्या विश्वास ठेवण्याने काय होणार आहे.डॉक्टरांनी नको कांं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला." अनघाचे वडील अनघाच्या आईची समजूत काढत होते. यावेळी अनघाच्या वडीलांचा आवाज जरासा कापरा झाला होता.
"डॉक्टर? अनघा आजारी वगैरे आहे कांं?" शिरीषने अनघाच्या आईला विचारले.
"नाही हो.माझी पोरगी एकदम ठणठणीत आहे.पण गेली तीन वर्ष डॉक्टर लोक ही गोष्ट  मान्य करायला तयार नाहीयेत."
"तुम्ही दोघे माझ्याशी असे कोड्यात बोलू नका. अगदी मन मोकळेपणाने माझ्याशी तुम्ही बोलू शकता.माझ्यावर विश्वास तुम्ही लोक डोळे झाकून ठेवू शकता.मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल."शिरीषने आर्जवी आवाजात अनघाच्या आईवडीलांना समजावून सांगितले.
"काय मदत तुम्ही आम्हाला करणार? आमच्या अनघाला तुम्ही बरे करू शकता कांं? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे." अनघांच्या वडिलांच्या बोलण्यात दुःख भरलेले होते.
"सर्व गोष्टींंवर उपाय असतात.मनुष्य प्रयत्न करत नाही." शिरीषने आत्मविश्वासाने हे वाक्य बोलले.
"आम्ही काय कमी प्रयत्न केले कां? गेली तीन वर्षे तेच तर करतोय." अनघाच्या वडीलांनी हातातील पेपर टेबलावर ठेवत अनघाच्या आणि राकेशच्या फोटोकडे पाहिले.
"होईल सर्व काही ठीक. अनघाचे आणि राकेशचे लग्न झाले की  सर्व काही ठीक होईल."
अनघाच्या आईवडिलांना शब्द सुचेना. त्यांनी शिरीषच्या या बोलण्यावर फक्त एकमेकांकडे पाहिले. त्या निशब्द नजरेत असंख्य शब्दांचा समावेश होता. खूपदा निरव शांतता अधिक बोलकी असते.
"चांगले घरातले वाटता तुम्ही." अनघाच्या वडीलांनी विषय बदलत शिरीषला विचारले.
"प्रोजेक्ट डिझाइनर आहे. गिरगावात राहतो.घरी आईवडील आहेत." शिरीषला ही अनघाच्या घरच्यांचा विश्वास जिंकण्यासाठी चांगली संधी वाटली.
"छान.... मग प्रोजेक्ट्सचे काम सोडून अनघाच्या विषयात रुची असण्यामागे काही विशेष कारण?" अनघाच्या वडील आता शिरीषबरोबर अधिक मोकळेपणाने बोलत होते.
"प्रोजेक्ट्स डिझाईन झाले आहेत. काहींचे थोडेफार काम बाकी आहे. तेही काम पूर्ण होईल.... कारण म्हणाल तर अनघा यांंचे व्यक्तीमत्व मला आवडले.पण अनघा कोणते तरी गूढ स्वतःच्या भोवती लपेटून वावरत आहे, असे मला वाटले म्हणून मी हे सर्व विचारतो."
"सर्वच प्रश्नांची उत्तरे नसतात सरपोतदार. काही प्रश्न अनुत्तरित राहणेच चांगले असते."
"म्हणजे प्रश्नांची उकल करण्यात तुम्ही शरणागती पत्करली आहे तर"
"शरणागती पत्करली असे नाही म्हणता येणार, पण आशेचा किरण दिसत नाही. आणि गेल्या तीन वर्षांमध्ये आम्हाला त्या गोष्टीची सवय देखील झाली आहे."...अनघाच्या वडीलांचा गळा दाटून आला होता.ते सोफ्यावर येऊन बसले.
" मी तर रडून थोडीफार मोकळी तरी होते.अनघाचे वडील मात्र मनाच्या आतल्या आत दु:ख दाबण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला त्रास घेतील पण लोकांना बोलणार नाही." अनघाच्या आईने चहाचे कप ट्रेमध्ये एकत्र आणत शिरीषला सांगितले.तो ट्रे घेऊन ती किचनमध्ये गेली.
"बाय द वे .अनघा घरात नाही कां?" शिरीषने विचारणा केली.
"तिचा १० ते ११ डान्सचा क्लास असतो रोज सकाळी." अनघाचे वडील शांतपणे बोलले.
"अरे वाह छान. डान्स देखील करतात अनघा."
शिरीषने असे बोलत अनघाच्या आईवडीलांचे चेहरे बघितले.दोघांचेही चेहऱ्यावर भावनांचा अभाव होता.
"ती समोरच्या टेबलावर पुस्तकांची रांग दिसते ना. ती सगळी पुस्तके अनघाने वाचून काढलेली आहेत."अनघाच्या आईच्या शब्दांमध्ये पोरीचे कौतुक बागडत होते.
" क्या बात है.वाचनासारखा माणसाचा सोबती नाही." असे बोलत शिरीष पुस्तकांच्या दिशेने गेला. काही पुस्तके त्याने बघितली.
"वडीलांची लाडकी लेक आहे अनघा.अनघाने बोलून दाखवलेली प्रत्येक गोष्ट वडील क्षणात हजर करणार." अनघाच्या आईने हे वाक्य बोलता क्षणी अनघाच्या वडीलांच्या चेहऱ्यावर हास्याची एक छोटीशी रेषा उमटली.
"ते तर दिसतेच आहे काकू." शिरीषने अनघाच्या वडीलांकडे पाहत प्रतिक्रिया व्यक्त केली.
"तो समोर फोटोत दिसतोय ना अनघाबरोबर.तो राकेश. राकेश सहस्त्रबुद्धे."
"हो...ते लक्षात आले केव्हाच माझ्या. छान जोडीदार निवडला आहे अनघाने."
"निवड तर चांगलीच होती.पण सर्व काही माणसाच्या मनासारखे थोडीच होते." असे बोलून अनघाच्या वडीलांनी पुन्हा शून्यात बघायला सुरुवात केली.
" निवड चांगली असेल तर त्याचे परिणाम देखील चांगलेच असतात." शिरीष खुर्चीवर बसत म्हणाला.
"असे तुमचे मत आहे." अनघाचे वडील बाल्कनीत पाहत म्हणाले.
"कधी करत आहेत अनघा आणि राकेश लग्न?" शिरीषने हातात घेत अनघाच्या वडीलांना विचारले.
अनघाच्या वडीलांनी पुन्हा एकदा विषयावर उत्तर देणे टाळले.
"बाकी सरपोतदार तुमच्याशी बोलून छान वाटले.बसा अनघा येईलच आता." अनघाच्या आईने समोरच्या सोफ्याची कुशन ठीक करत शिरीषला सांगितले.
"काकू तुम्ही राकेश आणि अनघाच्या लग्नाचा विषय कां टाळत आहात?" शिरीषने थेट बाँब टाकला. अनघाच्या आईने अनघाच्या वडीलांकडे पाहिले.
"कारण अनघा आणि राकेशचे लग्न कधीही होणार नाही." अनघाच्या वडीलांच्या बोलण्यात भीषण थंडपणा होता.
"म्हणजे? अनघा तर सांगत असतात की त्या लवकरच लग्न करणार आहेत म्हणून." शिरीषला आता बोलायचे राहवले नाही.
पुन्हा एकदा अनघाचे आईवडील गप्प झाले.
"तुमचा लग्नाला विरोध आहे कां?"
"नाही ...आम्ही कशाला विरोध करु.अनघाच्या आनंदासाठी आम्ही काहीही करायला तयार असतो." अनघाची आई बोलली.
"मग अनघा आणि राकेशचे लग्न कां होणार नाही" शिरीषने विचारले.
शिरीषकडे पाहत अनघाच्या वडीलांनी वाक्य उच्चारले, "कारण राकेश या जगात नाही."

मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल झाल्यानंतर जी एक शांतता पसरली जाते,तशी अवस्था शिरीषची झाली होती. तो फक्त अनघाच्या वडीलांकडे पाहत होता.
"तीन वर्षांपूर्वी दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानाच्या अपघातात राकेश ठार झाला." 
असे बोलून अनघाचे वडील शांतपणे बाल्कनीत निघून गेले.शिरीषचे डोके सुन्न झाले होते.अनघाची आई फक्त शांतपणे हे सर्व ऐकत होती.

"अग अनघा... आटप लवकर. किती नटशील...जशी काय आज पहिल्यांदा राकेशला भेटणार आहेस"
"थांब ग आई....झालेच तयार."
"राकेशला फोन केला होता कां तू सकाळी?"
"हो ग आई.सकाळी फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वी एअरपोर्टवरुन राकेशने कॉल केला होता मला."
" परवा ते बापट आले होते घरी.म्हणाले परांजपेच्या मुलीचे लग्न जवळ आले आहे आणि परांजपे निवांत आहेत."
"बापट कसे आहेत माहिती आहे ना तुला आई. बाबांची खेचायला त्यांना जाम आवडते."
"काँलेजपासूनचे दोस्त आहेत बापट तुझ्या बाबांचे...म्हणत होते अनघाच्या लग्नात धमाल उडवून देणार आहेत ते."
" बापट काका,धमाकेदार आहेत"
"बरं...तू आता आवर आणि पटकन बसस्टॉपवर जाऊन राकेशला घरी घेऊन ये.थेट घरी यायचे सोडून राकेशला तुला बसस्टॉपवर भेटायला बोलवण्यात नेहमी कोणता आनंद मिळतो हेच आम्हाला कळत नाही."
"तो थोडा हटके आहे आई..आमची पहिली भेट बसस्टॉपवर झाली होती,म्हणून प्रत्येक वेळी त्याचा हा सगळा खटाटोप सुरु असतो."
"तुमच्या दोघांचे काय चालू असते ते तुमचे तुम्हालाच माहिती. आम्ही लोक झालोत जुने."
"प्रेम कधी जुने होत नाही आई."
"बरं बाई....आवर तू...तुझे बाबा टीव्ही बघणे जरा सोडतील तर शप्पथ." असे बोलून अनघाची आई  हॉलमध्ये गेली.अनघाचे वडील निवांतपणे टीव्ही पहात होते.
"टीव्ही बंद करा आधी.लग्नपत्रिका तयार झाल्या की हे फोन करुन विचारा त्या माणसाला."
"करतो ग फोन.प्रत्येक गोष्टीत तुला घाई."
"अहो मुलीचे लग्न आले आहे आणि तुम्ही मात्र निवांत आहात.तरी बरं लाडक्या लेकीचे लग्न आहे."
"ज्यांचे लग्न आहे ते दोघे निवांत आहेत. तुझीच धावपळ सुरू आहे."
"धावपळ तर होणार. तरी बरं राकेश दिल्लीहून मुंबईला यायला निघाला आहे. नाही तर मांडवात नवरा गायब असे झाले असते."
"तुझे जोक पण तुझ्या जेवणासारखे. मिळमिळीत."
"असू दे मिळमिळीत... आता जावई आल्यावर जावा दोघेही बाहेर जेवायला."

"आई बाबा तुम्ही दोघे काय एकमेकांना चिडवत बसला आहात.मी जाते बस्टाँपवर.राकेश येण्याच्या आधी तेथे पोहचायला पाहिजे."
"अनघा....अजून विमान आकाशात असेल. तू इतक्या लवकर बसस्टॉपवर जाऊन काय करणार आहेस."
"अहो बाबा...राकेशसाठी गिफ्ट देखील घ्यायचे आहे मला. म्हणून लवकर निघाले आहे."

अनघा दरवाज्याजवळ पोहचण्याच्या आधी टीव्हीवर बातमी सुरु झाली होती." सकाळी दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानाचा मुंबईजवळ भीषण अपघात. विमानातील सर्व ठार झाले असण्याची दाट शक्यता."

"अनघा तू घाबरु नकोस. बाबा एअरपोर्टवर फोन लावत आहेत. राकेश एकदम ठीक असेल."
अनघा सोफ्यावर टीव्हीवर एकटक बघत होती.तिचे डोळे थंड होते.हात थिजले होते.
"अहो लागतोय कां फोन एअरपोर्टवर... ही अनघा बघा कशी करते आहे. बेटा अनघा..काही तरी बोल.काय होतेय तुला."

शिरीषचे डोळे पाण्याने डबडबले होते.
"खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या दिवशी एअरपोर्टवर फोन लागला. विमानातील सर्व प्रवासी ठार झाले असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्या प्रवासी यादीत राकेश सहस्त्रबुद्धे हे नाव देखील होते."
अनघाचे वडील आवंढा गिळत बोलले.
"त्या दिवसानंतर अनघा जी बदलली ती अजूनही तशीच आहे."
"डॉक्टर काय म्हणतात?"
"डॉक्टर म्हणाले अनघाला तीव्र धक्का बसला आहे. राकेश अजूनही जीवंत असेच ती अजूनही समजते आहे तसेच समजून वागते.गेली तीन वर्षे ती रोज सकाळी १० वाजता नटूनथटून बसस्टॉपवर जाते राकेशला आणण्यासाठी."
"यावर काही उपाय नाही कां?"
"औषधे सुरु आहेत. डॉक्टर म्हणाले येईल गुण काही वर्षांमध्ये. किती वर्षे हे मात्र डॉक्टर सांगत नाही."

दरवाज्याची बेल वाजली.
"अनघा आली वाटते.तिच्यासमोर रडायचे नाही. तिला या विषयावर काही बोलायचे नाही. हाच नियम आम्ही दोघेही गेली तीन वर्षे पाळतोय."
असे बोलून अनघाचे वडील दरवाजा उघडायला गेले.
"अरे अनघा बेटा... चेहरा कां उदास तुझा?"
"बघा ना बाबा आज सुद्धा राकेश आला नाही. फोन केला तर फोन लागत नाही त्याचा.किती छान आवरुन गेले होते मी.सर्व फुकट गेले. किती वेळ त्या बसस्टॉपवर थांबू.शेवटी आले घरी."
"अग राकेश दिल्लीत बिझी असेल. तुझी खेचण्यासाठी त्याने तुला येतो असे सांगितले असेल. येईल तो.ते जाऊ दे.आत चल.तुझे पाहुणे आले आहेत आज आपल्या घरी."
"कोण पाहुणे."
"आत तर चल आधी."

"अरे सरपोतदार, तुम्ही चक्क आज आमच्या घरी. आश्चर्य आहे." अनघा शिरीषकडे पाहत डोळे मिचकावत म्हणाली.
"तुम्ही दिलेले आमंत्रण नाकारता येत नाही."
"हो कां...बरं आईबाबांनी तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास तर दिला नाही ना. त्याचे काय आहे की सरपोतदार, घरात कोणीही आले की त्याला पोरीचे कौतुक सांगत बसण्याची या दोघांनाही सवय आहे."
"त्रास कसला आला त्यात.प्रतिभावंत माणसाचे तर कौतुक होणारच."
"थँक्स सरपोतदार... मला आवडते विविध छंद जोपासायला."
"राकेश बाकी हँडसम आहेत."
"आहेच तो मुळी हँडसम...."
"राकेश आले की माझ्यातर्फे तुम्हाला पार्टी."
"वाह सरपोतदार... राकेशसाठी पार्टी, पण अनघाला काहीच गिफ्ट नाही."
"काय हवयं तुम्हाला गिफ्ट."
"तुम्ही अधूनमधून आमच्याकडे चहासाठी यायचे.हेच ते गिफ्ट."
"येईल की तुमच्या घरी.चहा छान आहे तुमच्या घरचा."
"बसा तुम्ही.मी आवरुन येते जरा."

वेदनांवर आपुलकी हेच सर्वोत्कृष्ट औषध असते.सहानभूतीला स्वार्थाचा दर्प नकळतपणे चिकटतो.आपुलकी,जिव्हाळा,प्रेम या गोष्टींनी माणसाला नाते निर्माण करता येते.
"सरपोतदार तुम्ही घरी यायला सुरुवात केल्यापासून अनघा खूप आनंदी राहायला लागली आहे. आम्हाला देखील खूप बरे वाटते आहे." अनघाचे वडील चहाचा कप शिरीषच्या हातात देत म्हणाले.
"हो ना ....एक वर्ष कसे निघून गेले समजलेच नाही. एक वर्षांपूर्वी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही दोघेही माझ्यासाठी अनोळखी होता.आज एक वर्षांनंतर  तुम्ही दोघेही माझ्या घरचे मेंबर्स झाले आहात."
"सरपोतदार तुम्ही येण्यापूर्वी आम्ही दोघे आणि तो पानवाला मोहन हे तिघेच अनघाच्या वेदनेचे  ओझे वाहत होतो.तुम्ही ते ओझे आता खूप हलके केले आहे."
तितक्यात दरवाज्याची बेल वाजली.
दरवाजा उघडून आत येत अनघाने शिरीषला पाहिले.
"काय म्हणतोस शिरीष...बघ ना आज देखील राकेशने मला टांग दिली.आज सुद्धा राकेश आला नाही. आता बसस्टॉपवर जाणेच बंद करणार आहे मी.यायचा तेव्हा येईल तो.अपुन की भी कोई सेल्फ रिस्पेक्ट है की नहीं."
अनघाच्या या बोलण्यावर शिरीष आणि अनघाचे आईवडील खळखळून हसले. 

हस-या चेहऱ्यावर दु:खाची दुखरी किनार असते.ती दुखरी किनार मनाच्या नजरेने बघायची असते.
"साहेब, तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर. माझी अनघा बेटी आज तुमच्या मुळे हळूहळू माणसात येत आहे."
"अहो मोहन काका,त्यात उपकार कोठून आले.काही माझे प्रयत्न आणि काही औषधे यामुळे अनघा हळूहळू सुधारत आहे."
"तसे नाही साहेब. तुम्ही माणूस म्हणून लय भारी आहात.नाही तर येथील लोकांनी अनघाला पूर्णपणे वेडे ठरवले होते. कोणी तिच्याशी बसस्टॉपवर बोलायचे नाही."
"चालायचे मोहनकाका...तुम्ही मात्र अनघाला प्रामाणिकपणे साथ दिली."
"कशी साथ नाही देणार साहेब. राकेश आणि अनघाचे प्रेम येथेच तर जुळले होते.राकेश मनाने खूप चांगला होता.अनघावर जीवापाड प्रेम करायचा.पण विमान अपघातात गेला बिचारा."
" आयुष्य यालाच तर म्हणतात.ओळखीची लोक साथ देत नाहीत आणि अनोळखी लोक मदतीला धावून येतात....बरं,अच्छा मोहनकाका मी आता निघतो.अनघाला डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे."

समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मुंबईतील उमेद रेस्टॉरंटच्या कॉर्नर टेबलवर बसलेले जोडपे समुद्राकडे एकटक पाहत निशब्द होते.
"आज ३ वर्षे झाली शिरीष आपल्याला भेटून. समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावर धडकून परत समुद्राच्या दिशेने परत जातात.तसे माझे आयुष्य झाले होते. रोजचे ते किनाऱ्यावर येणे आणि पुन्हा समुद्राच्या दिशेने जाणे.राकेशचे नसणे हे माझे मन मान्य करायला तयार नव्हते.त्या वर्तुळात माझे जग फिरत होते."
" तू  प्रॉमिस केले होते मला की तू भूतकाळातील गोष्टी आठवणार नाही म्हणून."
"तसे नाही रे शिरीष.भूतकाळातील गोष्ट आठवत नाही मी.तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात आलेल्या बदलांची दखल घेत आहे.
वादळात सापडलेल्या झाडावरील पानाला जसा निवारा मिळावा,तसा तू माझ्या आयुष्यात आलास.राकेशला विसरणे. राकेशचे या जगात नसणे,हे सत्य स्विकारणे माझ्यासाठी सहजासहजी शक्य नव्हते, पण तू प्रचंड संयमाने मला सावरले. मला साथ देत मला त्या वादळातून सुखरूपपणे बाहेर काढलेस."
"आता आभार प्रदर्शन आपण थांबू.डॉक्टरांना फोन केला होता मी.डॉक्टर म्हणाले की अनघा आता जवळपास ठीक झालेली आहे. औषधे ते हळूहळू बंद करणार आहेत."
"शिरीष तुच माझे सर्वात मोठे औषध आहेस."
"पतीला औषध म्हणणारी जगातील पहिली पत्नी असेल तू."
"लग्नानंतर एक वर्षांनेही तू माझी तितकीच काळजी घेत असशील तर तुला म्हणून औषध म्हणणे मला आवडते."
"बरं मिसेस सरपोतदार.... चहा संपवा लवकर. घरी जाऊन आपल्याला अरे संसार संसार  करायचा आहे."

सरपोतदारांची कार गिरगावच्या दिशेने निघाली होती.एक वाट पाहण्याचा प्रवास  सुखी संसारात परावर्तित झाला होता.

©मनोज राणे





Popular posts from this blog

I love Pune Traffic....

पुरोगामी मुळव्याध