प्रवास......

भुतकाळातील आठवणींच्या विजनवासात गेलेले  मन नव्या आशेने पुन्हा एकदा पुलंकित होते, नवी उभारी घेते..आपण आनंदी  आहोत हे उगाचच स्वत:लाच मन समजावून सांगते..
पुन्हा एकदा स्वप्नांची नव्याने जमवाजमव सुरु होते..पुन्हा तोच खेळ मन नव्याने खेळायला लागते ...प्रत्येक वेळी आपण फसतो हे त्याला माहिती असूनही.
           मेंदूला  क्षितीज  असते,पण मन शितीजापलीकडे  जाऊन पोहचते..वेदना, अपेक्षाभंग, मनस्ताप यांचे प्रचंड ओझे घेऊन मन पुन्हा पुन्हा आनंदाने मिरवत असते..नात्यांची तुटलेली  श्रुंखला पुन्हा एकत्र गुंफण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हाती निराशा येत राहते..
           नवी नाती, नव्या नात्यातील आपलेपणाची तुलना तुटलेल्या नात्याची नकळत  होत राहते..त्या नव्या नात्याचा काहीही दोष नसताना आपले मन त्या नव्या नात्याचा अपमान करत राहते..
         विहिरीमध्ये कोंडलेल्या मांजरीसारखी अवस्था..कितीही बाहेर येण्याच्या प्रयत्न केला तरी परत त्याच ठिकाणी मन घिरट्या घालत असते..माहित असते आपण चुकीचे वागतोय..इतर  लोकांना आपण  सांगितलेली  उपदेशयुक्त वाक्ये अशावेळी निर्जीव वाटायला  लागतात..त्या  शब्दांमधील फोलपणा आपल्याला जाणवायला लागतो..
              आणि कधीतरी कुठल्या तरी एका क्षणी..मन स्वताशीस  बंड करते..भावनेपेक्षा  व्यावहारीपणे विचार करायला लागते..पुन्हा  एकदा  वपुंची, वि .स खांडेकरांची वाक्ये मनाला  पटू  लागतात.."भग्न  स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही..स्वप्न भंग पावले तरी  दुसऱ्या स्वप्ना मागे धावणे हा खरा मानवी धर्म" हे  वि .स खांडेकरांचे  वाक्य मनाला  नव्याने ताजे  करते..मनाने उभारले विश्व, त्या विश्वाची मनापासून केलेली उपासना  आणि वास्तव यातील फरक कळायला  लागतो..
               मनाचा झालेला  हा नवा  बदल काही केल्या  उमगत नाही..कदाचित  वेदनामय भुतकाळ, अस्वस्थ  वर्तमान या  दोन्हीपासून दूर  जाण्यासाठी मनानेच शोधलेली  ती एक पळवाट असावी..
         "Everything Has Replacement" या  स्वार्थी संकल्पनेची सत्यता मनाने एकदा स्वीकारली की  मन दगडी बनण्याची प्रक्रिया सुरु होते..
             कदाचित माझे मन पण  त्याच वाटेवर असेल..!

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल