विचारांची पायवाट
विचार चालतात
ओळखीचीच ती पायवाट ,
ती आजही तशीच ओळखते मला
प्रथम भेटली होती तशी....
त्या वाटेचा आणि माझा रोजचा प्रवास
सहसा न चुकलेला ,
भेटते कधी सुखद आनंदाची झुळूक
विसरतो क्षणभर त्या वाटेची साथ
पण ती तशीच उभी पुढे असते
माझ्या येण्याची वाट पहात ...
नाही रागवत ,नाही रुसत कधी ती
ती फक्त माझ्याकडे पाहून हसते
काहीच न बोलता तिचे ते हसणे
पूर्ण प्रवासात कधी कधी मला छळते ..
दिवसामागून दिवस आले गेले
पण हा नित्यक्रम कधी नाही बदलला ...
सुखाची स्वप्ने अनोळखी वाटतात
मलाही आणि खुपदा तिलाही
नाही माहित काय शेवट असेल या अनामिक प्रवासाचा
निरुत्तर यावर मीही आणि माझी पायवाटही