शिव्या- एक अनाथ अभिव्यक्ती प्राबल्य
एखादी भाषा शिकायची असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकाव्यात, असं जाणकार सांगतात. कोणतीही भाषा आपल्याला पूर्णपणे आत्मसात झाली, असं कधी म्हणता येतं? जेव्हा त्या भाषेतल्या शिव्या आपल्या ओठांवर रुळतात.
शिव्या देणे योग्य की अयोग्य यावर मतमतांतरे आहेत.जगातील प्रत्येक मनुष्य शिव्या देतो.काही जण मनातल्या मनात शिव्या देतात तर काहीजण बिनधास्तपणे शिव्या देतात.
मानसोपचारतज्ज्ञ तर शिव्या देणे हे मानसिक आरोग्यासाठी हितकारक मानतात.मनुष्याच्या शरीरात रागाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते.या उर्जेचा निचरा होणं गरजेचं असतं. तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजेच शिवी.
लोकांचं पारंपरिक अभिव्यक्तिस्वातंत्र्य शिव्यांमध्ये असते, असं शिव्यांच्या महान प्रथेचं वर्णन करता येईल.शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात.
शिव्या या दुर्लक्षित शब्दधनाकडे नेहमीच कुत्सितपणे पाहिले जाते.कोणताही लेखी दस्तऐवज नसतानाही मनुष्याने हे शब्द धन जतन केले आहे.शिव्या पाठ कराव्या लागत नाही,शिव्या आपोआप लक्षात राहतात. मनुष्याने जेव्हा पहिला शब्द बोलला असेल तर तो शब्द शिवीच असेल याबाबत माझ्या तरी मनात तिळमात्र शंका नाही.प्राचीन शिलालेखांवर त्याकाळातील प्रचलित शिव्या कोरलेल्या तुम्हाला आढळतील.
शिव्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बहुसंख्य शिव्यांचा कल हा गुंतवणुकीकडे असतो.शिव्यांमध्ये नेहमी कशात तरी काहीतरी घालण्याचे सुतोवाच असते.कशातून काहीतरी Withdraw केले आहे अशी शिवी ऐकीवात नाही.शिव्यांचा तौलनिक अभ्यास करुन शिवीसंग्रह निर्माण काळाची गरज आहे.
शिवी आणि ओवीमधील एका अक्षराचा फरक मनुष्याला सज्जन आणि दुर्जन या व्याख्यांमध्ये विभागतो.मुलींनी इंग्रजीतून दिलेल्या शिव्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे वाटणारे त्याच इंग्रजी शिव्यांच्या मराठी भाषांतरला अश्लील म्हणतात.ही भाषिक विषमता शिव्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अडथळा ठरत आहे.
शिवी सारखा समाजाने निद्य ठरवलेला सामाजिक आचारही त्याच समाजाची सामाजिक संस्कृती समजून घेण्यासाठी आवश्यक असतो.
एखाद्याला अपमानित करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं यासाठी वापर होणाऱ्या शिव्यांना नकारात्मकतेची झालर असते. कोकण हे जसे महाराष्ट्राचे नैसर्गिक नंदनवन आहे, त्याचप्रमाणे कोकण हे शिव्यांचेही नंदनवन आहे. कोकणात शिव्या प्रेमानेही घातल्या जातात. मुंबईहुन पाहुणे अचानक येऊन दारात थबकल्यावर, ‘मायझया हस खय?’ असा प्रेमळ प्रश्न विचारला जातो. त्यामुळे शिव्या या प्रेमानेही दिल्या जातात यावर कोकणी लोकांचा गाढ विश्वास आहे.
आपण घरोघर मराठी बोलतो आणि खेडय़ापाडय़ांमध्ये तर सगळे व्यवहार मराठीतच होतात, या आधारावर मराठीतील शिव्यांचे सगळं व्यवस्थित सुरू आहे, असं मानणं ही आत्मवंचना ठरेल. नीट कान देऊन ऐकलं तर इंग्रजी शिव्या आणि हिंदी गालियाँ यांच्या प्रभावाने मराठी शिव्या नको त्या अर्थाने ‘संपन्न’ होऊ लागल्या आहेत,परभाषांमधील शिव्यांच्या आक्रमणामुळे मराठी शिव्या प्रदूषित होत चाललल्या आहेत, हे शब्दधन लुप्त होतंय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
ता.क: सदर लेख हा निव्वळ विनोदनिर्मितीसाठी लिहिलेला आहे.उपहासात्मक पद्धतीने शिव्या या प्रकाराकडे पाहण्याचा हा प्रयत्न केला आहे.शिव्या देणे हे वाईटच असते. त्यामुळे शक्यतो शिव्या टाळाव्यात.