पानिपत: गौरवशाली पराभव
★पानिपत....★
पानिपत... हा फक्त शब्द नाही.... मराठा साम्राज्याच्या इतिहासातील रक्तरंजित घटनांनी लिहीले गेलेले पान आहे....ज्या पानिपतने इतिहास उलथापालथ केला, त्या पानिपतचे नाव आज मात्र एखाद्या व्यक्तीच्या पराभव वर्णनासाठी वापरला जातो हे दुर्दैव आहे.
अब्दाली मराठ्यांशी युद्ध करण्यासाठी भारतात आला होता कां? तर उत्तर आहे,अजिबात नाही. अब्दाली आणि मराठा यांचे कोणती वैर नव्हते. अब्दाली तर दिल्ली लुटण्यासाठी भारतावर आक्रमण करुन आला होता.हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातून मराठा सैन्य हे आपल्या हिंदू भूमीवर आक्रमण केलेल्या विदेशी आक्रमकाला देशातून हाकलून देण्यासाठी उत्तर भारतात गेले होते.
शत्रूच्या मनाला कंप सुटावा इतक्या निधड्या छातीने लढला होता मराठा हिंदू.
पराभव डोळ्यांसमोरसमोर असतानाही
नजरेला नजर देऊन भिडला होता मराठा हिंदू.अनोळखी प्रदेश,अनोळखी संस्कृती, अनोळखी वेशभूषा तसेच छावणीत अन्नधान्याचा तुटवडा असताना, बलाढ्य शत्रूसमोर लढण्यासाठी अपुरे सैन्य असतानाही हिंदू लढले, प्राणपणाने लढले ,हिंदू भूमीवर टाकलेल्या वाईट नजरेला रोखण्यासाठी, गुलामगिरीचे साखळदंड झुंगारून क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी मराठे लढले,माघारी फिरण्याचे सगळे मार्ग खुले असतानाही मराठे एवढ्या जिद्दीने लढले की शत्रूलाही त्याच्या पराक्रमाचे गोडवे गावे लागले. युद्ध जिंकूनही शत्रू मनातून एवढा हरला की त्याने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याचे धाडस स्वप्नातही केले नाही.
पानिपत हा पराभव नव्हताच,तो एखाद्या भव्यदिव्य विजया इतकाच सन्मानदायक पराभव होता.
माणसाने रणसंग्राम असा करावा की पराभवही अभिमानाने मिरवता आला पाहिजे..... आणि पानिपत अशाच प्रकारचा वैभवशाली पराभव होता.