सुखाची ओंजळ
"कितीही लवकर निघालो तरी काही ना काही प्रोब्लेम्स निर्माण होतच राहतात...." असे मनाशी पुटपुटत शिरीष मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये शिरला.नेहमीप्रमाणे स्टेशन माणसांच्या गर्दीने ओथंबलेले होते.बाकी काही कां असेना मुंबईत गर्दीचा तुटवडा कधीही भासत नाही.मुंबईत समुद्राच्या लाटा आणि मुंबईतील गर्दी या दोन्ही गोष्टी नेहमीच उसळत असतात. गर्दीला ढकलत, स्वतःला सावरत शिरीष तिकीट खिडकीपाशी पोहचला.... "एक व्ही.टी" "एक तास लोकल ट्रेन बंद आहे...... देऊ कां तिकीट?" "बंद आहे?" मग इतकी लोकं स्टेशनवर कशी काय?" "माहिती नसलेले तुम्ही थोडे एकटेच आहेत.तेही तुमच्यासारखेच आहेत." तिकीट खिडकीच्या आत बसलेल्या माणसाशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही हे समजल्यावर शिरीष तेथून निघून स्टेशन बाहेर आला.व्ही.टीला कसे पोहचायचो हा प्रश्न निर्माण झाला होता.टॅक्सींंना शिरीषने हात करूनही एकही टँक्सी थांबायला तयार नाही.रस्त्यावरील प्रत्येक टँक्सी प्रवासी कवेत घेऊन धावत होती.चालत शिरीष पुढे आला.....काय करावे हे त्याला समजेना.जिग्नेश शहाला आज भेटणे कोणत्य...