मराठीपण हरवलेली मुंबई
★मराठीपण हरवलेली मुंबई★
मुंबई.... मराठी माणसाची.....मराठी माणसाने लढून मिळवलेली मुंबई...स्वप्न नगरी मुंबई.... सतत धावणारी आणि अनंत समस्यांनी ग्रासलेली....तरीही चेहऱ्यावर हास्य घेऊन लोकल ट्रेन्समध्ये गर्दी करणारी मुंबई,अडचणी आणि संकटांवर मात करीत जगण्याची उमेद देणारी मुंबई...जुन्याचा आदर आणि नव्याचे स्वागत करायला शिकवणारी ही मुंबई सर्वांनाच आपली वाटते.लोकल गाठण्याची धावपळ... लोकल चुकल्याने मिळालेला लेटमार्क... पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून होणारी तंगडतोड,पाण्याखाली गेलेले रेल्वे ट्रॅक,रस्त्यावरील खड्डे,अतिक्रमणे...आक्रसणारी मैदाने... झोपड्या... जुन्या इमारती... पडझड…हे सर्व सहन करत या शहरातील माणूस दैनंदिन व्यवहार पार पाडत असतो.या सगळ्या घडामोडी त्याच्या जीवनाच्या जणू अविभाज्य अंगच झाल्या आहेत.एका बाजूला असे नकारात्मक चित्र असले तरी हे शहर जगण्याची उमेद देते,नवी ऊर्जा देते,सगळ्यांना पंखाखाली घेते,सर्जनशीलतेला वाव देते..
पण सध्या मुंबईतून मराठीपण हरवत चाललेलं आहे, हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.येथे मराठीपण म्हणजे मराठी भाषा किंवा मराठी लोक असा नाही.मुंबईत पूर्वी मराठीपण ठायीठायी जाणवायचे.तो मराठी ठसा हळूहळू धुसर होत चालला आहे.मराठीपणच कशाला व्यवहारी स्पर्धेत मुंबईतील माणूसपण देखील इतिहासजमा होत चाललंय.पूर्वी मुंबई म्हणजे वेगळंच जग आहे असं वाटायचं, आणि अर्थातच ते आजही आहे.आज परळ असो की गिरगाव, दादर असो की जुहू, वर्सोवा, इथल्या जुन्या इमारती बघताना ७०-८० च्या दशकातील किंवा ब्रिटिशांच्या काळातील मुंबई कशी असेल याची किंचितशी झलक मिळते.
टॉवर्सच्या विळख्यात, पॉश झालेली मुंबई तिची खरी ओळख,खरा चेहरा हरवत चालली आहे.मुंबईत अजूनही जुन्या खुणा जपलेले मुंबईतले रस्ते,इमारती,पुतळे या गोष्टी आजच्या पॉश मुंबईपेक्षा जास्त जवळचे वाटतात.मुंबईची प्रमुख ओळख असलेल्या मुंबईतील त्या चाळी. रंग उडालेल्या,वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत वाळलेलं काळपट शेवाळं अंगाखांद्यावर मिरवणार्या या चाळींच्या खिडक्या असोत की गॅलर्यांमधून पत्र्यांच्या डब्यातून उगवलेली झाडं असोत,चाळीचं तिचं एक या सगळ्यासहित सौंदर्य आहे.कोणाला ते गचाळ चित्र वाटेलही कदाचित पण मुंबईची ओळख ही गजबजलेल्या चाळींशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
कापड गिरणी शिवाय मुंबईचे वर्णन कोणे एकेकाळी अधुरं होतं.आज बहुतेक मिल्स बंद पडलेल्या आहेत.त्याजागी उभे आहेत मॉल्स आणि कॉर्पोरेट ऑफ़िसेस.मुंबईची ही मराठी ओळखच आता पुसली जाऊ लागली आहे.हे चूक की बरोबर हा विषयच नाही,मात्र हळूहळू गायब होणार्या या चाळी आणि मिल्समुळे कुठेतरी आत काहीतरी हरवत चालल्याची भावना नक्कीच होते.मुंबईतील विविध विभागांची मूळ नावे पुसून अप्पर वरळी,अप्पर लोअर परेल,न्यू कफ परेड अशी मुंबईची नवी ओळख निर्माण करण्याच्या उचापती बिल्डर लॉबीने सुरू केल्या.नवीन बांधकामाची जाहिरात करताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित विभागाचा उल्लेख मूळ नावाशी विसंगत तसेच उच्चभ्रूंना खुश करण्यासाठी केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या मूळ नावाचा इतिहास पुसला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई शहर हे स्वप्नांचे शहर मानले जाते. देशाची आर्थिक राजधानी असलेले या शहराने अनेकांना स्वप्ने विकली.काहींची ती पूर्ण झाली तर काही जणांचे आयुष्य या स्वप्नांच्या मागे संपले,पण मुंबई आजही तशीच आहे.हे शहर अस्तित्वात असेपर्यंत ते तसेच राहील.येथे विकणार्या स्वप्नांसाठी अनेकजण आपले घरदार सोडून येतात.फुटपाथवर,झोपडीपट्टीत राहतात. मुंबईचा रागलोभ करतात;पण हे शहर सोडून जात नाही. कारण हे शहर म्हणजेच एक बाजार आहे.येथे विक्रेता कधी गिर्हाईक असतो तर गिर्हाईक हा कधी विक्रेता असतो.अनेकवेळा आपण कधी गिर्हाईक बनलो हे विक्रेत्याला कळत नाहीतर तसेच गिर्हाईकही आपल्या भूमिकेतून दुसर्या भूमिकेत कधी शिरतो हे त्याला उमजत नाही. या बाजारात प्रत्येकजण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते वाढवण्यासाठी झटत असतो.अनेकवेळा या बाजारात नितीमत्ता,मानवी मुल्ये विकली जातात तर काहीवेळी या मुल्यांना घट्ट पकडून माणुसकी आपले दर्शन घडवत असते.
ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मुंबईच्या हरवलेल्या मराठीपणाच्या प्रवासाचा वेध घेण्यासाठी उपयोगी पडते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक.बहुरंगी मुंबईला आपापल्या पुस्तकांतून जिवंत करणारे मराठीतील सुर्वे, ढसाळ, पाध्ये किंवा इंग्लिशमध्ये सलमान रश्दी, सुकेतु मेहता हे साहित्यकार प्रसिद्ध आहेत.१८७५ मधला पोलीस कमिशनर एडवार्ड, तत्कालीन पत्रकार नौरोजी डुमासिया, दिनशॉ वाछा, जेम्स मकलेन, लुईस ब्रॉम्सफील्ड आणि अर्थात गो. ना. माडगावकर यांनीही मुंबईच्या पूर्वीच्या रुपावर पुस्तके लिहून ठेवलेली आहेत.
मुंबईतील मराठीपण हरवण्याची कारणे कदाचित मुंबईचा अवाढव्यपणा, गर्दी, जीवनाची गती, वातावरणातील उत्साह, बहुसांस्कृतिक ओळख आणि उघडपणे लक्ष्मीशरण झालेली नीतिमत्ता,या गोष्टींमध्ये असावीत. पैसा या एकमेव दैवताला पूजणारे हे शहर अखेर याच कारणामुळे दुर्दशेच्या गर्तेत अडकले.कोणत्याही प्रकारचा निखळ आदर्शवाद मुंबईला झेपत नाही.