शब्दांकीत प्राजक्त
🌺सोशल मिडीयावरील शब्दांकीत प्राजक्त🌺
प्राजक्ताच्या फुलांंचा फोटो सोशल मीडियावर एखाद्या ठिकाणी नजरे समोर आला तरी मन किती प्रसन्न होते.त्या फोटोतूनही प्राजक्ताच्या फुलांंचा गंध मनाला मोहवतो.
सोशल मीडियावर भेटलेल्या काही माणसांंच्या बाबतीतही अगदी असचं होतं... ज्यांना आपण उभ्या आयुष्यात कधीही भेटलो नाही... पाहिलेले नाही... भेटू कां नाही याची शक्यता देखील माहिती नसते...अशी माणसे काही क्षणातच मनाला खूप आवडतात,आपली होऊन जातात ,इतकी आपली होतात की प्रत्यक्षात सहवासात असलेले लोक देखील काही वेळेला आपल्याला अनोळखी वाटायला लागतात.... ही जी ओढ असते ही आपल्यालाही अचंबित करते.....
प्रोफाइल फोटो पाहण्यापेक्षा कधीतरी पोस्टमध्ये लिहीलेल्या शब्दांमध्ये डोकावून पहावं....पोस्टमधील शब्द पोस्ट लिहीणा-या माणसांच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करत असतात.... शब्दांमधून मनुष्य पूर्णतः कळत नसला तरी माणसाचा एकंदर स्वभाव, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे,याचा अंदाज नक्कीच येतो.....पण या ठिकाणी हे नमूद करणे आवश्यक आहे की एखादी पोस्ट, त्यात लिहीलेले शब्द म्हणजे ती व्यक्ती नसते....त्या व्यक्तीच्या पोस्ट सातत्याने वाचल्यावर ,त्यातील शब्दरचनांचे निरीक्षण केल्यानंतर हा अंदाज येतो,कारण शब्दांची सुंदरता प्रसंगानुरुप असते....एखादा शब्द प्रत्येक प्रसंगात सुंदरच भासेल असे काही नसते..... बोललेल्या शब्दांपेक्षा लिहीलेल्या शब्दांची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते.
शेवटी काय,आपण सगळेच सोशल मीडियावर व्यक्तीने लिहीलेल्या शब्दांनी अधिक प्रभावित असतो.शब्दांमध्ये गोडवा,शालीनता, प्रामाणिकपणा,आणि विनयशीलता असेल,तर ते शब्द पोस्ट वाचून संपल्यानंतरही विचारांमध्ये काही क्षण तरी आपली सोबत करतात... त्या शब्दांची सोबत हवीहवीशी वाटणे...ते शब्दांकडे खेचले जाणे हे अनाकलनीय असले तरी त्या शब्दांशी अनामिक नाते निर्माण होण्याची ती सुरुवात असते.
शब्दांवर जीवापाड प्रेम करावे... कारण शब्द कधीही फसवत नाहीत...तुमची शब्द बोलण्याची,लिहीण्याची पद्धत,लिहीलेले शब्द वाचण्याची,ऐकलेले शब्द डिकोड करण्याची तुमची पद्धत तुम्हाला फसवत असते.
चांगल्या स्वभावाची माणसेच चांगले शब्द लिहू शकतात... शब्द संवेदनशील होण्यासाठी सर्वप्रथम शब्द लिहीणारा व्यक्ती संवेदनशील असणे आवश्यक असते. चांगल्या स्वभावाची,चांगल्या शब्दांचे लेखन करणारी माणसांशी सोशल मीडियावर मैत्री होणे ही सोशल मीडियावरील सर्वात मोठी कमाई असते.ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.आजकाल अशी माणसं सोशल मीडियावर भेटतात तरी किती प्रमाणात....सोशल मीडियावर चेहरे कमी आणखी मुखवटे जास्त... काही चेहऱ्यावरील मुखवटे लवकर उतरतात,काही चेहऱ्यावरील मुखवटे उशिरा उतरतात इतकेच.
हळूवार शब्दांची बॅग पाठीवर लटकवून सोशल मीडियावर फिरणारी माणसे कधी दिसली तर अशी माणसे जपावीत.अशी माणसे अत्तरासारखी असतात.... जेथे जातील तेथे स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा सुगंध घेऊन जातात....यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना देखील त्यांच्या व्यक्तीमत्वाचा काही अंश नकळतपणे चिकटून जातो.....त्यांच्या सवयी नकळतपणे आपल्यात उतरतात.... किंबहुना आपण त्या सवयी कॉपी करतो...
हे ऋणानुबंध कसे निर्माण होतात, कां निर्माण होतात, त्यांचा कालावधी किती असतो याचे उत्तर तसे कोणतेही नसते...
काही नात्यांना नावे नसतात...आणि कधी त्या नात्यांना बंधनात बांधण्याचा प्रयत्न देखील करु नये. अशी नाती सदैव जवळच असली पाहिजेत असेही नाही, तरीही आपल्या हृदयाच्या त्या विशिष्ट कोपऱ्यात ती नाती सर्वात वेगळी आणि सर्वात खास असतात. आपण फक्त अशा नात्यांमधील क्षण एन्जॉय करायचे असतात.🌺
✍️-मनोज राणे