भावनिक गुंतवणूक

★भावनिक गुंतवणूक★

काल फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला.एका  चित्रपटाचे शॉर्ट वर्जन होते ते.आधी मी सहज म्हणून व्हिडिओ बघत होतो,पण जसजसा व्हिडीओ मी अधिक लक्षपूर्वक बघायला लागलो,तसतसा मी व्हिडिओमध्ये गुंतून गेलो.त्या चित्रपटाची कथा अशा कुत्र्यावर होती, ज्याला त्याचा मालक सोडून गेला आहे;आणि तो कुत्रा दिवसरात्र विमानतळावर मालकाची वाट बघत असतो.तो व्हिडिओ बघून मी अक्षरशः भारावून गेलो,त्या शॉर्ट फिल्ममध्ये एकही डायलॉग नव्हता.तो पूर्ण चित्रपट  बघण्याची माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली,पण ना चित्रपटाचे नाव माहिती होते,ना व्हिडीओमध्ये चित्रपटाविषयी काही माहिती देण्यात आली होती.अनेक प्रयत्नानंतर गुगलवर मला त्या चित्रपटाचे नाव समजले,नाव होते A Dog Named Palma. 
    चित्रपटाचे नाव युट्युबवर सर्च केले.यूट्यूबवर चित्रपट तर मिळाला,पण तो रशियन भाषेत होता.पुन्हा शोधाशोध सुरु झाली.अधिक शोध घेतल्यानंतर इंग्लिश सबटायटल्स असलेला व्हिडिओ युट्युबवर मिळाला.२०२१ साली  प्रदर्शित झालेला A Dog Named Palma  हा चित्रपट आज मी युट्युबवर बघितला;आणि एक गोष्ट मी अत्यंत विश्वासपूर्वक सांगतो की इतका सुंदर चित्रपट मी आयुष्यात कधी बघितला नव्हता.अत्यंत सुंदर कथा असलेला हा भावनाप्रधान चित्रपट आहे.अत्यंत सुंदर कथा, अत्यंत सुंदर अभिनय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत सुंदरपणे केलेले चित्रपटाचे दिग्दर्शन.चित्रपट बघितला खरा,पण माझ्या मनात अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली आणि मी गुगलवर अधिक माहिती शोधू लागलो.त्या शोधामध्ये मला ही माहिती मिळाली की तो चित्रपट 1974 साली रशियामध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.मी त्या घटने विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माझ्या वाचण्यात अत्यंत हृदयस्पर्शी माहिती आली.तिच माहिती मी या ठिकाणी देत आहे.
   ही गोष्ट जवळपास अर्ध्या शतका एवढी जुनी आहे.१९७४ साली रशियातील व्नुकोवो विमानतळावर अल्मा नावाच्या कुत्र्याच्या मालकाकडे कुत्र्याचे आरोग्य प्रमाणपत्र नसल्याने त्याला त्याच्या अत्यंत लाडक्या कुत्र्याला विमानात सोबत घेऊन जाता येत नव्हते.त्याने अनेक प्रकारे त्याचे आणि कुत्र्याचे एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,पण विमानतळावरील कर्मचारी वर्गाला समजावण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर कुत्र्याचा मालक हा शेवटी विमानात चढला.कारण त्याला दुसऱ्या राज्यात नोकरी मिळाली होती आणि त्याला त्या राज्यात जाणे अत्यंत आवश्यक होते.त्याआधी त्याने त्याच्या लाडक्या कुत्र्याला विमानतळावर प्रेमाने हात लावून निरोप दिला.रशियन बनावटीचे शक्तिशाली आयएल-१८ लायनर विमान कुत्र्याच्या मालकाला सोबत घेऊन दुसऱ्या राज्यात निघून गेले.तो कुत्रा धावपट्टीवर खूप धावला,त्याने विमानाला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण कुत्रा विमानाला रोखून धरु शकला नाही.पण कुत्र्याने विमानतळ सोडले नाही.त्याला पकडण्यासाठी विमानतळावरील सुरक्षा रक्षक धावले,पण कुत्रा कोणाच्या हाती लागला नाही.स्थानिक कुत्र्यांच्या गटाने त्या कुत्र्याला त्रास दिला नाही,कदाचित त्या सर्व कुत्र्यांना त्या दु:खी कुत्र्याचे दुःख समजत होते. हळूहळू त्या कुत्र्याला बाकीच्या कुत्र्यांची सवय लागली.बंदर सेवा मेंढपाळांच्या घरी तो राहू लागला.
त्या कुत्र्याचा बाकीच्या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता,तो बाकीच्या लोकांना जवळही येऊ द्यायचा नाही.सकाळपासून ते रात्रीपर्यंत तो आकाशाच्या दिशेने बघत बसायचा.आकाशात विमान दिसले की तो कुत्रा विमानतळाच्या दिशेने धावत असे आणि विमानातून उतरणार्‍या प्रत्येक माणसाकडे बघून तो आपल्या मालकाला शोधत असे.मालक कधीतरी त्याला दिसेल या आशेवर तो कुत्रा चिकटून बसला होता. जवळपास ३ वर्षे तो कुत्रा रोज विमानतळावर उतरणार्‍या प्रत्येक विमानाच्या दिशेने धावत असे.असेच एके दिवशी तो एका विमानाच्या मागे धावत असताना विमानाच्या कॉकपिटमधून वैमानिकाने कुत्र्याला विमानाच्या मागे धावताना पाहिले.कुत्र्याच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने विमानतळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि कुत्र्याला धावपट्टीवरून दूर नेण्यास सांगितले.विमानतळावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या कुत्र्याची विमाना मागे धावण्याची सवय माहिती झाली होती,त्यांनी वैमानिकाला कुत्र्याची सवय सांगितली आणि तो मालकासाठी प्रत्येक विमाना मागे दररोज धावत असतो हे देखील सांगितले.वैमानिकाचे नाव व्याचेस्लाव्ह अलेक्झांड्रोविच होते.तो युद्धात डचाऊचा युद्धकैदी होता.त्याला छावण्यांंमध्ये ठेवण्यात आले होते.त्याला माहित होते की दुःख काय असते आणि त्याने कुत्र्याच्या डोळ्यात ते दु:ख पाहिले होते.तो अस्वस्थ झाला.त्याने कोमसोमोलस्काय प्रवदा यांच्या संपादकीय कार्यालयाला भेट दिली आणि अल्मा नावाचा कुत्रा अजूनही त्याच्या मालकाची रोज वाट पाहत असल्याचे लिहिण्यास सांगितले. यदाकदाचित कुत्र्याच्या मालकाने न्यूजपेपरमधील कुत्र्या विषयीची बातमी वाचली तर तो कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी येईल,अशी त्याला आशा वाटत होती.
पत्रकार युरी रोस्ट यांनी कुत्र्याच्या विमानतळावर धावण्याच्या सवयीबद्दल आणि मालकाची रोज वाट पाहत असल्याचा उल्लेख असलेला लेख प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण रशियातील हजारो लोकांना कुत्र्याच्या विषयी आकर्षण निर्माण झाले.सर्व न्यूजपेपरमध्ये या विषयी लेख छापून येऊ लागले.त्या कुत्र्याचा फोटो प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आणि टीव्हीवर दिसू लागला.कुत्र्या विषयी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात सहानुभूती निर्माण होऊन तो कुत्रा रशियातील सर्वात चर्चेचा विषय बनला.त्या कुत्र्याला बघण्यासाठी,त्या कुत्र्याबरोबर स्वतःचे फोटो काढून घेण्यासाठी विमानतळावर रोज गर्दी होऊ लागली.
   ही बातमी कुत्र्याच्या मालकाने देखील बघितली,पण लोक आपल्याला क्रूर व्यक्ति समजतील,आपल्याला नावे ठेवतील,आपला द्वेष करतील या भीतीने कुत्र्याचा मालक कधीच त्या कुत्र्याला आणण्यासाठी गेला नाही,पण त्या मालकाने एक काम केले.त्याने निनावी पत्राने वैमानिकाला सर्व कहाणी सांगितली.तो कुत्र्याला घेऊन येण्यासाठी कांं येऊ शकत नाही याची सर्व कारणे त्या पत्रामध्ये त्याने लिहिली होती. कुत्र्याशी केलेल्या विश्वासघाताचा त्याला पश्चाताप वाटत होता.त्यामुळे तो घाबरुन शेवटपर्यंत त्या कुत्र्याला आणण्यासाठी गेला नाही.
   मालक विश्वासघातकी असला तरी मालकावर प्रचंड प्रेम करणाऱ्या त्या कुत्र्याच्या नशिबी एकनिष्ठ आणि नि:स्वार्थ मैत्री होती.युक्रेनियन क्लासिकचे वंशज असलेल्या वेरा कोटल्यारेवस्काय यांनी क्यीवमधील आपली नोकरी सोडली होती.कुत्र्या विषयी आणि त्या कुत्र्याला मालकाने दिलेल्या धोका विषयी तिनेही ऐकले होते.तिने तो कुत्रा ज्या ठिकाणी राहत होता तिथे जाऊन मोठ्या धीराने आणि प्रेमाने त्या कुत्र्याला आपलेसे केले,त्या कुत्र्याचा विश्वास जिंकला.तो कुत्रा तिच्याबरोबर आनंदाने राहू लागला.पुन्हा उड्या मारू लागला.नव्या मालकीनने सगळा वेळ कुत्र्याबरोबर एकत्र घालवला.
कुत्र्याला घेऊन ती तिच्या घरी आली.कुत्रा देखील खूप आनंदाने घरामध्ये फिरु लागला. तिला एक लहान मुलगी होती.लवकरच त्या कुत्र्याची त्या लहान मुली बरोबर अत्यंत घनिष्ठ मैत्री झाली.तो दिवस रात्र त्या लहान मुली बरोबरच खेळायचा.त्या लहान मुली बरोबरच तो जेवण करायचा.लहान मुलगी अभ्यास करताना तोदेखील तिच्या सोबत असायचा.ती मुलगी त्याला सोबत घेऊन बागेत फिरायला जायची.त्याच्याबरोबर डान्स करायची.हळूहळू कुत्रा मालकाचे दुःख विसरून गेला आणि तो पूर्णपणे त्या लहान मुलीचा एकनिष्ठ मित्र बनून गेला.तो आता आनंदी होता,तो सुखी होता.त्याच्या जवळ त्याच्या भावना समजून घेणारे लोक होते.

या घडामोडींचा समावेश असलेले Waiting for Two Years नावाचे पुस्तक कुत्र्याविषयी  सर्खप्रथम लेख लिहीणा-या पत्रकाराने लिहीले होते.जे जगभरात लोकप्रिय झाले होते. साहजिकच चित्रपट बनवणा-यांना कुत्र्याच्या या भावनिक गोष्टीविषयी आकर्षण निर्माण झाले .या पुस्तकांवर आतापर्यंत ३ चित्रपट बनले आहेत. २०२१ साली  प्रदर्शित झालेला A Dog Named Palma  हा चित्रपट आज मी युट्युब वर बघितला आणि एक गोष्ट मी अत्यंत विश्वास पूर्वक सांगतो की इतका सुंदर चित्रपट मी आयुष्यात कधी बघितला नव्हता.आता चित्रपट म्हटले की कथेत थोडे बदल होणार.जरी चित्रपटात बदल केले असले तरी चित्रपट अत्यंत सुंदर आहे.यूट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे . या चित्रपटाची लिंक दिली आहे

https://youtu.be/w08KShV8QSY

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल