नात्याचा बहर
★ नात्याचा बहर ★
सर्वोत्कृष्ट नात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे,त्या नात्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला,विभिन्न मतांना, विचार करण्याच्या पद्धतींंना महत्त्व दिले जाते. प्रेम आणि आपुलकी यांच्या बांधणीत रचलेल्या नात्याला समंजसपणाची चौकट असते.स्वतःच्या मतांचा आग्रह,त्यासाठीचा अट्टाहास या अनावश्यक गोष्टींची घट्ट वीण अशा नात्यांमध्ये सैल होते. नात्याची श्रीमंती इथं सोपी आणि भावस्पर्शी होते.भावस्पर्शी स्वरलगाव, मुक्त विचार यांचा प्रभाव नात्यावर असला की ते नाते अधिक सुंदरपणे बहरते.
नात्यात सर्वमान्य नियम असावेत; पण त्यांची कठोरता नसावी.नियम सुसह्य;ते नवतेच्या निर्मितीचं असायला हवे.नियमांचे दडपण नसावेत तर त्यात जपणुकीचा अनुराग असावा.
समंजसपणाच्या बीजात नात्याच्या नवतेची उपज असते.हा समंजसपणा जेथे असतो तेथे नाते फुलण्याचा वेग अधिक प्रमाणात उपलब्ध असतो.नात्यात एकमेकांना समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली विचारांची गहराई असते .
ऋणानुबंधाच्या अवकाशात काही वेळा वादी-संवादी-विवादी-अनुवादीच्या चांदण्या चमकतात.त्यातून मतभेदांचा,रुसवा या गोष्टींचा लपंडाव खेळत नाते अलगदपणे पुढं पुढं जात असते.विशिष्ट लयीत पुढं सरकणारे हे नाते गैरसमजाच्या तिरोभावाच्या झाडामागंही लपते; पण काही क्षणच.पुन्हा तेच नाते समजंसपणाच्या रफूने टिपूर चांदणं फुलवत मनाला मुग्ध करत राहते.
नात्यात अशा अनेक विविधारंगी प्रतिमा निर्माण होत राहतात.कधी आषाढ्यातील हिरवाई दिसते,तर कधी अवसेचं चांदणं, कधी सौख्याच्या रिमझिमणाऱ्या सरींचा पाऊस बरसतो,तर कधी हळुवारतेला कवेत घेत रोमांटिकपणाची बंदिश फुलते.
स्वर-शब्द-लय-ताल या घटकांतून गाण्यात मेलेडी निर्माण करता येते तशीच मेलेडी नात्यातही निर्माण करता येते. अमूर्ताला मूर्त रूप आपण द्यायचं असतं.नात्यातील जुनाटपणा झटकून नात्याला नवनवीन सजावट करायची असते.