संकल्प प्रेम स्वप्नांचा

★संकल्प प्रेम स्वप्नांचा.....★

नववर्षाचा पहिला दिवस...पहिली पहाट ...पहिला सूर्योदय..... या विचारांच्या सानिध्यातच त्याला अलार्मच्या आवाजाने जाग  आली...त्याने रात्रीच पहाटेचा ५ वाजताचा अलार्म लावला होता. आजपासून दररोज व्यायाम.... बस्स झाली टंगळमंगळ... आता व्यायामाचा एकच ध्यास असा त्याने मनाशी संकल्पच केला होता... फ्रेश होऊन त्याने खोलीतच सूर्यनमस्कार आणि योगा केला....अंगावर मस्तपैकी कालच नवीन आणलेला स्पोर्ट्स सूट घातला.. बेडवर बायको आणि मुलगा गाढ झोपेत होते...."ही म्हणजे एक नंबरची आळशी... व्यायाम नको हिला.... माणसाने कसं फीट असायला हवं"...  असे मनात बायको विषयी पुटपुटत तो जॉगिंगला निघाला.
     आजूबाजूला रस्त्यावर तशी गर्दी नव्हती.काही लोक त्याच्या प्रमाणेच व्यायामाला आलेले होते...मस्तपैकी  ३ किलोमीटर रनिंग केल्यानंतर येताना त्याने न्यूजपेपर, दूध, ब्रेड विकत घेतला... बायकोसाठी मोग-याचा गजरा विकत घेतला... "आज तिच्या केसांत गजरा माळायचा.....प्रेमाने मिठीत घेत तिच्या ओठांचे........" असे काही तरी मनात आणत तो थोडासा हसला.....आणि तो घराच्या दिशेने झपाझप पावले टाकत चालू लागला.... 
     इतक्यात " Hi handsome, Happy New Year... "असा मंजूळ आवाज त्याच्या कानाच्या पाठीमागून आला... त्याने चमकून मागे पाहिले तर नुकतीच बिल्डिंगमध्ये राहायला आलेली मिसेस स्नेहा कोल्हटकर ..... लग्न होऊन जेमतेम ३ वर्षे झालेली.... तरीही स्नेहा ही महाविद्यालयीन तरुणींना लाजवेल इतकी सुंदर आणि फीट होती.त्याला ती मनातून खूप आवडायची.
" Happy New Year वहिनी..." तो चाचरतच बोलला.
"एकदम हँडसम बनत चालला आहात तुम्ही हल्ली.... त्यात आता सकाळी जॉगिंग सुद्धा सुरु केले आहे तुम्ही.... म्हणजे आता मुलींना फिदा होण्यावाचून गत्यंतरच नाही" ती हसत बोलली.
"काही तरच वहिनी तुमचे....जमेल तितके फीट राहण्याचा प्रयत्न करत असतो इतकेच"
"जरा कमी excercise करत जावा...नाही तर मला माझा नवरा म्हातारा दिसायला लागेल तुमच्या समोर"...असे बोलून ती त्याच्याकडे बघत डोळे मिचकावत लाजली.
"तशा तुम्ही देखील खूप सुंदर दिसता वहिनी, आणि एकदम फीट सुद्धा......" त्याने मनाशी धैर्य एकटवत दिल का राज बोलून टाकला.
"काहीही मस्करी करु नका तुम्ही सकाळी सकाळी...तशीही मी सुंदर असून फायदा काय....आपल्या हक्काच्या माणसाने कधीतरी सुंदरतेचे कौतुक देखील करायला हवे ना.... आमचा नवरा एक नंबरचा अरसिक...."
असं म्हणून स्नेहाचे लक्ष त्याच्या हातातील मोग-याच्या गजरा ठेवलेल्या पिशवीकडे गेले.
"पिशवीत फुले कसली आहेत?"
"आपलं ते मोगरा, झेंडू,, गुलाब....फुलं....नाही नाही ...मोग-याचा गजरा आहे" तो गडबडून गेला.
"अय्या बायकोसाठी....ohhhh so sweet of you... So Romantic... You wife is such a lucky lady .....आणि एक मी आहे...आम्हाला तर कोणी साधं फुलं पण कोणी देत नाही.. " तिने उदासीनतेचा चेहरा केला.
" सुंदर चेहरा असलेल्या लोकांनी उदास राहायचे नसते.चेहरा फुलासारखा कोमजतो....हा मोग-याच्या गजरा तुमच्यासाठीच विकत  घेतला आहे मी" त्याने धाडस दाखवले.
" काहीही चावटपणा करू नका...तुम्हाला कसे माहिती होते की मी आता तुम्हाला रस्त्यावर  भेटणार आहे म्हणून? " 
" दिल की बाते दिल ही जाने....मेरे दिल ने कहाँ की आज कोई हसीन चेहरा मिलनेवाला है. "
"अय्या...शायरी सुद्धा करता तुम्ही... किती गोड आहात तुम्ही......" असे म्हणत ती त्याच्या किंचितशी जवळ आली.
तो तिचे संकेत समजला.... त्याने तिचे गुलाबी हात हातात घेतले....तितक्यात
"कोणी सांगितली होती एवढी ढोशायला. हजार वेळा सांगितले आहे त्या मित्रांसोबत जात जाऊ नका म्हणून,पण हा माणूस जाणार... आणि दारु ढोसणार. "
त्याला काहीच समजेना हा आवाज येतोय कोठून. त्याने पुन्हा स्नेहाचे गुलाबी हात हाती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
"अहो उठा आता,.... तुम्ही आजपासून पहाटे  जाणार होता ना जॉगिंगला... ९ वाजले आता"
त्याने डोळे उघडले.... आजूबाजूला पाहिले तर समोर बायको ....च्यायला स्वप्न होते तर....असे तो हताशपणे पुटपुटला.
ब्रशवर टूथपेस्ट टाकून तो दात घासत बाल्कनीत आला... त्याने बाल्कनीतून खाली रस्त्यावर पाहिले.....स्नेहा कोल्हटकर जॉगिंग करून परत येत होती... तिच्या फिट नवऱ्याबरोबर

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल