आपण सगळे ढोंगी

★आपण सगळे ढोंगी........★

जगातील सर्वात उच्च प्रतीची सज्जन माणसे ही सोशल मिडीयावर असतात. दोषांचे षडरिपू ज्यांच्या आसपासही फिरकत नाहीत. गुणांचा झरा अखंडपणे वाहत असतो.काय ते शब्दांमधील मार्दव, काय ती महिलांच्या विषयीची काळजी,काय तो महिलांना दिला जाणारा सर्वोच्च पातळीवरील सन्मान.... सगळचं कसं  दृष्ट लागण्यासारखे ...सोशल मिडिया म्हणजे अवीट गोड स्वभावाच्या लोकांचा एका जागी जमलेला समूहच........
भलेही घरात आईने थोडं जरी काम सांगितले तरी त्यांच्या कपाळावर आठ्या उमटतात.... बायकोवर ते हात उचलतात....मारण्यासाठी बहिणीच्या अंगावर जे धावून जातात.
     खिडकीच्या बाहेरील फुललेल्या फुलांकडे ज्यांचे कधीही लक्ष जात नाही.... ते मोबाईलवर फुलांचे screensaver ठेवतात.
   पाऊस बरसायला लागल्यावर सोशल मीडियावर कवितांचा पाऊस पाडणारे प्रत्यक्षात मात्र पावसाळ्यातील चिकचिक बघून निषेधाच्या छत्र्या उघडतात.
        घरात आईने,बायकोने,बहिणीने राबून बनवलेल्या एखाद्या पदार्थाचे कौतुक करण्यासाठी कधी थोबाडातून कौतुकाचा एखादा शब्द जास्तीचा जाणार नाही, पण सोशल मिडीयावर एखाद्या अनोळखी मुलीने एखाद्या डिशचा फोटो अपलोड केला की त्यावर कौतुकाची बारीश आपण करणार, भलेही त्या मुलीने तो पदार्थ स्वतः न बनवता एखाद्या रेस्टॉरंटमधून मागवलेला असेल.
    फेसबुकवर इतरांच्या बायकांची आणि इतरांच्या गर्लफ्रेंड्सची जेवढ्या जिव्हाळ्याने, आपुलकीने,पोटतिडकीने, प्रेमाने काळजी घेतली जाते,तेवढीच काळजी स्वतःच्या बायकोची घेतली तर कितीतरी संसार सुरळीतपणे चालतील.स्वतःच्या घरात रोज भांडणाच्या कपबश्या फुटणारे,उठसूट बायकोवर खेकसणारेही फेसबुकवर सुखी संसारची सूत्रे सांगत फिरत असतात.
           सोशल मीडियावर ओसंडून वाहणारी सामाजिक संवेदनशीलता तेव्हा कोठे गायब होते,जेव्हा बसमध्ये गर्दीत वयोवृद्ध लोक उभे असतात आणि तुम्ही आरामात सिटवर बसलेला असता....
         महिलांना सन्मान दिला पाहिजे... महिलांचा आदर केला पाहिजे... यावर ढिगभर लांबलचक पोस्ट लिहीणारे रस्त्यावर मुलींनी पूर्ण पोशाख घातलेला असूनही त्या मुलींच्या शरीराच्या विशिष्ट भागांचे आकारमान डोक्यात विचार करत बसतात.....चोर, दरोडेखोर, बलात्कारी हे परग्रहावरुन व्हिसा घेऊन येत नाहीत.ते तुमच्या आमच्यामधीलच असतात.
      सरतेशेवटी काय तर,तुम्ही काय किंवा मी काय,आपण सगळे ढोंगी होतो,ढोंगी आहोत आणि कायमच ढोंगी राहणार.

✍️-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल