फेक अकाऊंट आणि शहाणपणा
★फेक अकाऊंट आणि शहाणपणा★
सोशल मीडियावर असताना लोक जितक्या काळजीपूर्वक आपल्याशी बोलणा-या एखाद्या माणसाचे अकाउंट फेक आहे की ओरिजनल आहे,या गोष्टीची वारंवार आणि बहुतेक वेळा नको इतक्या सूक्ष्मपणे तपासणी करतात, त्याच्या ३०% जरी आपण रियल लाईफमध्ये आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांची तपासणी केली तर आपल्या आयुष्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
मुख्य म्हणजे फेक आणि ओरिजनल या गोष्टीच तकलादू आहेत.सोशल मीडियावर फेक अकाउंट असतात ही गोष्ट जरी 100% खरी असली तरी बनावटी भावनांचा मुखवटा घालून आपल्याभोवती वावरणारे अनेक लोक आपल्या रिअल लाईफमध्येदेखील असतात. मग सोशल मीडियावरील फेक अकाउंटवाले आणि रिअल लाईफमधील मुखवटा लावून वावरणारे आपल्या ओळखीचे लोक, यांच्यामध्ये कोणताही फरक नसल्याचे आपल्या लक्षात येते.
प्रोफाइलमध्ये फोटो ओरिजिनल आहे की इतरांचा फोटो लावला आहे,यावरूनही संबंधित व्यक्तीचे अकाऊंट फेक आहे की ओरिजिनल आहे, हे ठरविण्याचा फाजील उद्योग सोशल मीडियावर नियमितपणे चालूच असतो.
प्रोफाईलमधील फोटोवरुन फक्त अकाऊंट फेक आहे की ओरिजनल हे ठरवले जात नाही तर प्रोफाइलमधील फोटो वरून त्या व्यक्तीचा स्वभाव चांगला आहे की वाईट आहे हेही ठरवण्याचा शहाणपणा करणारे अनेक लोक सोशल मीडियावर तुम्हाला पावलापावलांवर बघायला मिळतील.इथे प्रश्न हा निर्माण होतो की ज्या लोकांनी आपले ओरिजनल फोटो प्रोफाईलमध्ये लावलेले आहेत ते सर्व लोक सज्जन आहेत, गुणवंत आहेत,पापभिरू आहेत असा त्याचा अर्थ होतो कांं, तर अजिबात नाही. प्रोफाईलमध्ये आपला ओरिजनल फोटो लावून देखील सोशल मीडियावर फसवाफसवी करणाऱ्या टपोरी लोकांची संख्या सोशल मीडियावर सर्वाधिक आहे. प्रश्न हा निर्माण होतो की आपण सर्व लोक सोशल मीडियावर लोकांनी लिहिलेले लेखन वाचण्यासाठी येत असतो,एकमेकांचे प्रोफाइलमधील फोटो पाहून एकमेकांना जज करण्याची गांड मस्ती मुळात माणसाला हवी कशाला?
सोशल मीडियावर केले गेलेले लेखन चांगले आहे की वाईट यावर संबंधित व्यक्तीची गुणपारख व्हायला हवी,पण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे रियल लाईफमध्ये लोक ढोंगीपणा करतात,अगदी तशाच प्रकारचा ढोंगीपणा लोक सोशल मीडियावरदेखील करत असतात.असा चोंबडेपणा करून ह्या लोकांना नेमकी कोणती गोष्ट प्राप्त होते हेच आतापर्यंत लक्षात आलेले नाही.
बरं,लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर काळजी घेऊनही त्या लोकांच्या नशिबी सोशल मीडियावर बहुतांश वेळा फसवाफसवीच येत असते.ज्या लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांचे ओरिजनल फोटो लावले आहेत अशा लोकांकडूनच मोठ्या प्रमाणावर इतर लोक फसवले जात असतात; आणि जे लोक मनाने चांगले असतात,पण कोणत्याही कारणास्तव ते आपली ओरिजनल ओळख सोशल मीडियावर जाहीर करू इच्छित नाही अशा लोकांना फेक समजून त्यांच्याशी बोलताना अंतर ठेवणा-या लोकांच्या ओंजळीतून चांगल्या व्यक्तीचा सहवास, मैत्री, प्रेम या गोष्टी निसटून जातात,आणि शिल्लक राहतो प्रोफाईलमध्ये स्वतःचा ओरिजिनल फोटो लावून सोशल मीडियावर इतर लोकांना फसवणा-या लोकांचा गाळ.