अस्मितेचे आभासी इमले

★अस्मितेचे आभासी इमले ★

पुसले भविष्य
विझले सगळे धगधगते निखारे
उभे राहिले रस्त्यांंवर गुन्हेगारांचे तांड 
बेरोजगारांच्या लांबलचक रांगा
मराठी माणसावर ही वेळ कोणी आणली
ते तरी एकदा सांगा?

सारासार विचार बाजूला ठेवत 
नाक्यावर गर्दी जमवत
स्वतःच्या भवित्याकडे दुर्लक्ष करत
बेभानपणे कोणी दिल्या अस्मितेच्या बांगा
मराठी अस्मितेच्या पाठी कोण धावले 
ते तरी एकदा सांगा?

आभासी घोषणांचा पाऊस
त्यावर तुमचा बेजबाबदार प्रतिसाद
बुद्धी गहाण टाकत
पलटी झालेला अकलेचा टांगा
निवड कोणाची चुकली 
ते तरी एकदा सांगा?

खोटी आशा बनावट स्वप्ने 
बाळगून तुम्ही होता
ते फसवत होते
तुम्ही फसत होता
त्यांंनी तुमचा वापर केला 
त्यांना वापर कोणी करु दिला 
ते तरी एकदा सांगा?

दोष कोणा कोणाला देणार
किती दिवस गुजराती,परप्रांतीयांच्या
नावावर स्वतःचे अपयश लपवणार
दुकानांवर दगड मारण्याची हात उठत होते
प्रयत्नांची झोळी रिकामी कोणाची होती
ते तरी एकदा सांगा?

तुमच्या चाळीचे वासे निखळत गेले
त्यांच्या महालांचे इमले वाढत गेले
चाळीतील खुराड्यात सिमीत झाली 
तुमच्या स्वप्नांची दुनिया
कोण याला जबाबदार
ते तरी एकदा सांगा?

हळूहळू मराठी गतवैभव 
मुंबईत लुप्त होत गेले
मराठी टक्का कमी झाला
आपण सगळेच यात दोषी
हे आपण कधी मान्य करणार
ते तरी एकदा सांगा?

- मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल