नाते







नाते…..

फळ विक्रेत्याकडून फळ घेताना तो फळाचा एक छोटासा तुकडा कापून आपल्या हातावर ठेवतो फक्त चव ओळखण्यासाठी. त्या चिमुकल्या तुकड्यातून जर गोडवा मनाला भावला, तर संपूर्ण फळ घरी नेऊन खाण्याची इच्छा होते. पण कधी कधी त्या एका तुकड्यातूनच आपल्याला संपूर्ण फळाची चव कळते आणि मग उरलेले फळ खाण्याची घाई उरत नाही.

नात्यांचंही काहीसं असंच असतं...

मग ते नातं मैत्रीचं असो, प्रेमाचं असो किंवा अनामिक जिव्हाळ्याचं. एखादी नवी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आवरणांआड दडलेली माणूसकी जाणून घेण्याची एक अनावर उत्सुकता मनात जन्म घेते. आपण तिच्या शब्दांचा अर्थ शोधू लागतो, तिच्या शांततेमागची कारणं उलगडू पाहतो, तिच्या भूतकाळाच्या पाऊलखुणा मोजू लागतो आणि तिच्या वर्तमानाच्या प्रत्येक वळणावर आपली नजर थबकू लागते. हळूहळू त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या अनेक छटा आपल्या परिचयाच्या आकाशावर उमटू लागतात.पण कधी कधी वाटतं काही गोष्टी अनभिज्ञच राहू द्याव्यात,कारण प्रत्येक पडदा उघडल्यावर त्यामागे सौंदर्यच सापडेल असं नाही. काही रहस्यं रहस्यच राहिली, तर त्यांचं गूढ आणि आकर्षण टिकून राहतं. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असते, असं उगाच म्हटलं गेलेलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा जाणून घेण्याचा अट्टहास केला, तर कदाचित त्या नात्याच्या सहजतेवरच आपण प्रश्नचिन्ह उभं करतो.

आपण एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश केला म्हणून त्याचा भूतकाळ पुसला जात नाही आणि आपल्या आगमनाने त्याचा वर्तमानही नव्याने लिहिला जात नाही. त्या व्यक्तीने आपल्याआधीही एक संपूर्ण आयुष्य जगलेलं असतं.काही आठवणींसह, काही जखमांसह, काही नात्यांसह आणि काही अशा गुपितांसह, ज्यांवर आपला अधिकार नसतो.म्हणूनच प्रत्येक नात्याला एक अदृश्य सीमारेषा असावी.ती भिंत नसावी; फक्त एक मर्यादा असावी. इतकीच, की समोरच्याच्या अस्तित्वात आपण हरवून जाऊ नये आणि आपल्या अस्तित्वातून समोरच्याला कैदही करू नये. त्या सीमारेषेमुळे दोन सुंदर गोष्टी साध्य होतात,आपण नात्याशी मनापासून जोडलेले राहतो, पण त्यात स्वतःला पूर्णपणे गमावत नाही; आणि दुसरं म्हणजे, नात्यावर मालकी हक्क गाजवण्याऐवजी आपण त्याला मोकळ्या आकाशासारखं जगू देतो.

खरं तर आपण एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तो केवळ कुतूहलापोटी नसतो. कुठेतरी मनाच्या तळाशी त्या नात्याकडून काहीतरी मिळवण्याची, काहीतरी अपेक्षित करून घेण्याची इच्छा दडलेली असते. म्हणूनच आपण प्रश्न विचारतो, उत्तरं शोधतो, अर्थ लावतो, संकेत टिपतो आणि नकळत त्या नात्याचं गणित मांडू लागतो.पण काही नाती गणितासारखी नसतात.त्यांना बेरीज-वजाबाकीची गरज नसते. अपेक्षांच्या हिशेबाची गरज नसते. स्पष्टीकरणांच्या पावत्या मागण्याचीही गरज नसते.खरं नातं हे नदीसारखं असतं.आपण त्याचा प्रवाह ठरवत नाही; ते स्वतःची वाट स्वतः शोधतं. त्याला बहरण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज नसते. दोन माणसांमध्ये खरा जिव्हाळा असेल, तर संवादासाठी शब्द शोधावे लागत नाहीत; मौनालाही अर्थ लाभतो. भेटण्यासाठी निमित्तं शोधावी लागत नाहीत; आठवण स्वतःच दार ठोठावते. आणि नातं जपण्यासाठी सतत हात पुढे करावा लागत नाही; कधी कधी अंतरावरूनही मनं एकमेकांच्या जवळ असतात. म्हणून प्रत्येक नात्याला पूर्णपणे उलगडून पाहण्यापेक्षा, त्याला थोडं गूढ राहू द्यावं...

फळाची संपूर्ण चव जाणून घेण्यासाठी ते अख्खं खाण्याची गरज नसते; कधी कधी एक छोटासा तुकडाही पुरेसा असतो.तसंच एखाद्या माणसाला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवायही त्याच्यासोबत एक सुंदर नातं जगता येतं,कारण नात्याचं खरं सौंदर्य हे एकमेकांना किती जाणून घेतलं यात नसतं...

तर किती न जाणूनही एकमेकांना मनापासून स्वीकारलं, यात असतं.म्हणून प्रत्येक नात्याला पूर्णपणे उलगडून पाहण्याचा हट्ट करू नये...

काही दारं अर्धवट उघडीच राहू द्यावीत, काही प्रश्न अनुत्तरित राहू द्यावेत आणि काही गोष्टींच्या अर्थापर्यंत जाण्याऐवजी त्यांचा अनुभव घेण्यात समाधान मानावं. कारण एखाद्या माणसाला पूर्णपणे जाणून घेण्याच्या नादात आपण अनेकदा त्याच्यातलं गूढ हरवून बसतो; आणि गूढ हरवलं की कुतूहल संपतं, कुतूहल संपलं की ओढ कमी होते आणि ओढ कमी झाली की नातं हळूहळू सवयीचं होत जातं.

नात्याला मात्र सवय व्हायचं नसतं...त्याला सतत नव्यानं उमलायचं असतं.

फळाचा एक छोटासा तुकडा जसा संपूर्ण फळाची चव सांगून जातो, तसंच एखाद्या माणसाच्या सहवासातला एखादा क्षण, एखादं वाक्य, एखादी नजर किंवा एखादं निःशब्द समजून घेणं कधी कधी त्या संपूर्ण नात्याची ओळख करून देण्यासाठी पुरेसं असतं.

म्हणून नात्यात शिरताना हातात प्रश्नांची यादी घेऊन जाऊ नये; मनात थोडी जागा घेऊन जावी. समोरच्याच्या आयुष्याचा ताबा मिळवण्यापेक्षा त्याच्या आयुष्यात आपली एक सुंदर जागा निर्माण झाली, तरी ते पुरेसं असतं.

कारण काही नाती आपल्याला मिळवण्यासाठी नसतात...ती आपल्याला जगण्यासाठी भेटतात.

आणि म्हणूनच प्रत्येक नात्याची चव जाणून घेण्यापेक्षा, त्याच्या प्रत्येक घासातला गोडवा मनापासून अनुभवावा.

कदाचित नात्यांचं खरं सौंदर्य हेच असावं.

एकमेकांना पूर्णपणे जाणून न घेताही, एकमेकांसोबत अपूर्णतेतही पूर्णपणे आनंदी राहता येणं.

शेवटी, नातं किती खोल आहे यापेक्षा, त्याच्या सहवासात आपलं मन किती शांत होतं हेच कदाचित त्याचं खरं मोजमाप असतं.






Popular posts from this blog

वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट.

सुखाची ओंजळ

नात्याची मखमली शाल